अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवत असल्याचा दावा केला आहे. भारताने यावर सडेतोड उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रशियासोबतचा व्यापार पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवणार आहे. तसेच, भारताच्या तेल खरेदीचा निर्णय देशाच्या राष्ट्रीय हितावरआधारित असतो, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर, भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत दावा केला होता की, "मी ऐकले आहे की भारताने आता रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सत्य आहे की नाही मला माहित नाही, पण जर हे खरे असेल तर हे एक चांगले पाऊल आहे." ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली होती.
(नक्की वाचा- AI Affected Jobs: AI मुळे 'या' 40 क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका! तुमचा जॉब सुरक्षित आहे का? वाचा संपूर्ण यादी)
परराष्ट्र मंत्रालयाने भारताची भूमिका केली स्पष्ट
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना रशियाकडून तेल खरेदीबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “ऊर्जा खरेदीच्या गरजांबाबत आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय उपलब्ध आहे, कोणत्या दराने मिळत आहे आणि जागतिक परिस्थिती काय आहे, याचा विचार करून निर्णय घेतो. रशियन आयात थांबवल्याच्या बातम्यांबद्दल आम्हाला कोणतीही विशिष्ट माहिती नाही.” पुढे ते म्हणाले, “कोणत्याही देशासोबतचे आमचे संबंध त्याच्या गुणवत्तेवर आधारित आहेत आणि त्यांना कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहू नये.”
(नक्की वाचा- दाऊद ते श्रीप्रकाश शुक्ला! गुन्हेगारी जगात प्रेमात पडलेले डॉन अन् त्यांच्या गर्लफ्रेंड्सचे 5 किस्से)
ट्रम्प यांनी म्हटले होते की, "एक दिवस भारताला पाकिस्तानकडून तेल खरेदी करावे लागू शकते." या विधानावर बोलताना जयस्वाल यांनी थेट टिप्पणी करणे टाळले. त्यांनी केवळ "या प्रकरणात मला कोणतीही टिप्पणी करायची नाही" असं म्हटलं. इराणसोबत व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर अमेरिकेने केलेल्या संभाव्य निर्बंधांवर बोलताना जयस्वाल यांनी म्हटलं की, "आम्ही निर्बंधांची दखल घेतली आहे आणि यावर विचार करत आहोत."