Omar Abdullah Meets Pm Narendra Modi : जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. असं सांगितलं जात आहे की या बैठकीत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विस्ताराने चर्चा झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाम हल्ल्यानंतर ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी जम्मू कश्मीर सरकार आणि नॅशल कॉन्फरन्सकडून केंद्र सरकारला जे सहकार्य अपेक्षित आहे ते सगळं सहकार्य करण्यास तयार असल्याचे कळते आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्दांवर नॅशनल कॉन्फरन्स केंद्र सरकारच्या पाठीशी असेल असे कळते आहे.
नक्की वाचा :'पाकिस्तानला आशिया कपमधून बाहेर करा', सुनील गावस्करांची मोठी मागणी
जम्मू कश्मीमधील सुरक्षेसंदर्भातील आव्हाने वाढू लागली आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्यात आल्याने चिंता अधिक वाढली आहे. केंद्र सरकारने या हल्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल असे वेळोवेळी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्यामागे असणाऱ्या कोणालाही सोडणार नाही असे सांगितलं आहे.
नक्की वाचा :फिदायीन होईन, पाकिस्तानात जाऊ द्या! कर्नाटकच्या मंत्र्याने पीएम मोदींकडे मागितली परवानगी
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध करत दहशतवादाविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की ज्यांनी हे दहशतवादी कृत्य केले आहे ते मानवतेचे शत्रू आहेत आणि ते नरकात सडतील. फारूख अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या आदिल हुसैन शाह याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले होते. पर्यटकांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोनी ऑपरेटर म्हणून काम करणारा आदिल देखील तिथे होता. दहशतवाद्यांनी त्यालाही गोळ्या घातल्या होत्या.
पाकिस्तानविरोधातील केंद्र सरकारकडून अपेक्षित कारवाईबद्दल फारूख अब्दुल्ला यांना विचारले असता त्यांनी म्हटले की कारवाई काय करावी याचा अधिकार पंतप्रधानांना असतो, त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. मात्र फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तावर सडकून टीका केली. पाकिस्तान पीपल्स पार्टीचा नेता बिलावल भुट्टो याने भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल विचारलं असता फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले की अशल्या लोकांकडे लक्ष दिलं तर कश्मीर कधीही प्रगती करू शकणार नाही.