थर्मसमधून थेट उकळता गरम चहा प्यायल्याने बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. दिप्तांशु महतो असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. कोलकाता येथील नरेंद्रपूर स्थित रामकृष्ण मिशन आश्रम शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे शाळा परिसर आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिप्तांशुच्या कुटुंबीयांनी शाळेच्या प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत शाळेच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
वडिलांसमोर मुलाचे शेवटचे शब्द
मरण पावलेला विद्यार्थी दिप्तांशु याचे वडील मनरंजन महतो हे कलकत्ता उच्च न्यायालयात वकील आहेत. वडिलांनी याबाबत सांगितलं की, "मला सकाळी 11.20 च्या सुमारास शाळेतून फोन आला आणि तातडीने बोलावण्यात आले. मी दुपारी 1 वाजता शाळेत पोहोचलो, तेव्हा माझा मुलगा दिप्तांशु सतत खोकत होता."
जमिनीवर डाग पडू नये म्हणून गरम चहा प्यायला
"मला सांगण्यात आले की, सकाळी 9.45 ते 10 च्या दरम्यान त्याने थर्मसमधून उकळता चहा प्यायला होता. मी जेव्हा त्याला विचारले की बाळा तू असा थेट गरम चहा का प्यायला? तेव्हा त्याने सांगितले, 'बाबा, चहा खाली सांडून जमिनीवर डाग पडू नयेत, जमीन खराब होऊ नये म्हणून मी तो तसाच प्यायलो.'
(नक्की वाचा- Hingoli News: जमिनीतून गूढ आवाज अन् क्षणात हादरे! हिंगोलीतील नागरिक दहशतीत)
मनरंजन यांनी पुढे सांगितलं की, "मी त्याला गाडीकडे घेऊन गेलो, त्याने पाण्याचा एक घोट घेतला. त्यानंतर माझ्या छातीवर डोके ठेवत तो शुद्ध हरपला. शाळा प्रशासनाने त्याला आधीच रुग्णालयात का नेले नाही? ते माझ्या येण्याची वाट का पाहत राहिले? माझ्या मुलाच्या पाचन तंत्रात गंभीर अंतर्गत जळजळ झाली होती."
मनरंजन यांनी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्यांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर सॉल्ट लेक जवळील एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दिप्तांशुला मृत घोषित केले.
तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात?
डॉ. रविकांत चतुर्वेदी यांनी 'नवभारत टाइम्स'शी बोलताना सांगितले की, सामान्यतः चहा प्यायल्याने मृत्यू होणे हे अशक्य आहे. मात्र, थर्मसमधून थेट अत्यंत कडक उकळता चहा प्यायल्यास खालील 5 कारणांमुळे जीव जाऊ शकतो. मात्र खरं कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल.
- अत्यंत उकळता चहा प्यायल्याने गळ्यातील अन्ननलिका किंवा श्वास नलिका पूर्णपणे जळून किंवा गंभीर जखम होऊन निकामी झाली असावी.
- अतिशय गरम चहामुळे गळ्यातून थेट मेंदूकडे जाणाऱ्या अत्यंत संवेदनशील नसांना तीव्र धक्का बसून त्या डॅमेज झाल्या असाव्यात.
- तीव्र अंतर्गत उष्णता किंवा वेदनेच्या धक्क्याने अचानक हृदय बंद पडले असावे, मात्र हे थेट चहाच्या गुणामुळे होत नाही.
- जर तो थर्मस अनेक दिवसांपासून साफ केला नसेल आणि त्यात चहा तसाच राहिला असेल, तर त्यात विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.
- गरम चहा थेट पोटात गेल्याने अंतर्गत रक्तवाहिन्या फुटणे किंवा मेंदूला होणारा रक्तपुरवठा बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(नक्की वाचा- Kalyan News: खाऊ आणायला गेलेली आई परतलीच नाही, शॉक लागून महिलेचा मृत्यू; पोलिसाची संतापजनक कृती)
शाळेचे 3 कर्मचारी निलंबित
या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक स्वामी इष्टेशानंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, विद्यार्थ्यांशी मारहाण आणि छळ केल्याच्या जुन्या तक्रारी व या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.