Law Stories : सद्यस्थितीत कौटुंबिक न्यायालयात मोठ्या संख्येने घटस्फोटाची प्रकरणं प्रलंबित आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक सामाजिक समस्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेकदा घटस्फोटासाठी अत्यंत क्षुल्लक कारणं दिली जातात. अशावेळी कोर्ट त्याकडे कसं पाहतं? क्षुल्लक कारणावरुन घटस्फोट दिला जातो का, याबाबत अॅड. मधुरा देशपांडे यांनी ऑर्डर ऑर्डर या पॉडकास्टमध्ये माहिती दिली. यावेळी त्यांनी एका केसचं उदाहरण देत महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर नेमकं काय बदललं?
ही केस आहे एक मराठी मुलगा आणि गुजराती मुलीची. लग्नाआधी त्यांचे २ ते ३ वर्षे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर पहिली दोन वर्षे व्यवस्थित गेली. मात्र मुल झाल्यानंतर परिस्थिती बदलली. विविध कारणं सांगून तो पत्नीला दूषणं देऊ लागला. लग्नाच्या साधारण ६ ते ७ वर्षांनी या मुलाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला तेव्हा दोघेही एकाच छताखाली राहत होते.
घटस्फोटाच्या अर्जात नेमकं काय म्हटलं?
पतीने या घटस्फोटाच्या अर्जात म्हटलं, लग्नानंतरची दोन वर्षे चांगली गेली. मात्र मूल झाल्यानंतर आमच्यात कधीही शरीरसंबंध आले नाहीत. मूल झाल्यानंतर ती खूप जाड झाली होती. तिला जीममध्ये जाण्याचा अनेकदा सल्ला दिला होता. पण ती ऐकत नव्हती. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत नाही, त्यामुळे ती मला सूट होत नाही. यावर ती मला उलट उत्तर देतं. परिणामी आमच्यात भांडण होतं. याशिवाय ती नॉनव्हेज खात नव्हती आणि बनवतही नाही. आमच्या घरात आवडीने मांसाहार केला जातो. मात्र यात तिचं कोणतंही सहकार्य प्राप्त होत नाही. ती नोकरी करते, पैसे कमावते याचा अहंकार तिला आहे, तिची घरात वागणूकही तशीच आहे. ती वारंवार स्वत:ला संपवण्याची धमकी देते. यामुळे मला मनस्ताप होत आहे.
पत्नीने काय सांगितलं...
यावेळी पत्नीने सांगितलं की, नॉनव्हेज खाण्याचा मुद्दा भांडणात असूनच शकत नाही. कारण लग्नापूर्वीच पतीला याबाबत माहीत होतं. मी नॉनव्हेज खात नाही आणि बनवत नाही हे त्याला माहीत होतं. मात्र मी कधीच त्याला नॉनव्हेज शिजवण्यापासून किंवा खाण्यापासून रोखलं नाही. लग्नानंतरची दोन वर्षे कधीच नॉनव्हेज खाण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली नाही. लग्नापासून माझी शरीरयष्टी थोडीशी जाडसर आहे, हे त्याने पाहिलं होतं. मूल झाल्यानंतर मी अधिक जाड झाले त्यामुळे पतीला यावरुन मला वारंवार दुषणं दिली. तो माझ्या खाण्याकडेही लक्ष ठेवून होता. मी प्रेमविवाह केलाय, मूल आहे. त्यामुळे हे नातं वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.
जाड झाली म्हणून कार्यक्रमांना घेऊन जाण्यास टाळाटाळ...
या प्रकरणात पत्नीकडून लग्न वाचविण्याचा प्रयत्न केला जात होता. पत्नीचे आणि तिच्या सासूचे संबंधही चांगले होते. पत्नीचे आणि मुलाचे दागिनेही सासूकडे जबाबदारीने ठेवण्यात आले होते. मात्र पत्नी जाड झाली म्हणून ते तिला कार्यक्रमांना घेऊन जाण्यास टाळत होते. पती कोर्टात वेगळं आणि सासू कोर्टात वेगळंच सांगत होती. दोघांच्याही बोलण्यात प्रचंड विरोधाभास होता. सासूची सुनेविरोधात कोणतीही तक्रार नव्हती.
पती-पत्नीमध्ये असे वाद होत असतात. यातून घटस्फोट मागणं योग्य नाही. पत्नीकडून आत्महत्येची धमकी दिल्याचंही खोटं असल्याचं तिने सांगितलं. मात्र दुसरी बाजू म्हणजे पतीनेही यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचं दिसते. तिला कोणताही डॉक्टर किंवा तत्सम उपाययोजना केल्या नाहीत. रोजच्या भांडणांखेरीस दोघांनीही घटस्फोट घ्यावा असं दिसलं नाही. त्यामुळे शेवटी कोर्टाने हा घटस्फोट देण्यास नकार दिला. यासाठी समुपदेशनाची मदत घ्या. अॅड देशपांडे यांनी शेवटी सांगितलं की, पती किंवा पत्नी दोघांपैकी कुणा एकाला घटस्फोट हवा म्हणून कोर्ट घटस्फोट देत नसतं. यासाठी घटस्फोटाची कारणं पाहिली जातात.
(वरील लेख युट्यूबवरील पॉडकास्टवर आधारित आहे. NDTV मराठी यातून कोणताही दावा करीत नाही)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world