क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पंजाबमधील नवांशहर येथील रहिवासी आणि प्रसिद्ध पॉवरलिफ्टर सुखवीर सिंग याचा एका स्पर्धेदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. 350 किलो वजनाची डेडलिफ्ट मारून स्पर्धा जिंकल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली.
नेमकी घटना काय?
सुखवीर सिंह लुधियाना येथील सलेम टाबरी परिसरात आयोजित पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुखवीरने प्रथम 150 किलोची बेंच प्रेस यशस्वी केली. त्यानंतर त्याने 350 किलो वजनाची 'डेडलिफ्ट' उचलून उपस्थितांची मने जिंकली आणि तो विजयी ठरला. मात्र, ही कामगिरी केल्यानंतर काही वेळातच त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या.
मैदानावरच कोसळला
छातीत दुखू लागल्याने सुखवीर सावरण्याचा प्रयत्न करत आपल्या कारकडे निघाला. मात्र, कारमध्ये बसण्यापूर्वीच तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. सहकारी आणि आयोजकांनी तातडीने त्याला लुधियाना येथील एका खासगी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 'कार्डियक अरेस्ट' (Cardiac Arrest) हे त्याच्या मृत्यूचे प्राथमिक कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

फिटनेसचा आयकॉन
सुखवीरचे इंस्टाग्रामवर 'Sukh Fitness'* नावाचे अकाउंट असून त्याचे 55 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो स्वतः एक फिटनेस ट्रेनर होता आणि बलाचौर येथे त्याचे स्वतःचे जिम होते. तरुणांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी तो नेहमीच खेळाकडे वळण्याची प्रेरणा द्यायचा. सोशल मीडियावर त्याने 800 हून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत.
सुखवीरच्या निधनाने बलाचौर परिसरात शोककळा पसरली आहे. त्याला संपूर्ण धार्मिक रितीरिवाजांनुसार आणि लाल पगडी घालून अखेरचा निरोप देण्यात आला. एका उमद्या खेळाडूचा असा अकाली अंत झाल्याने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world