कुरकुरे मागितल्याने आईने मारहाण केलेल्या मुलाने थेट पोलिसांना फोन लावून तक्रार केल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. मुलाला 20 रुपयांचे कुरकुरे घेण्यासाठी पैसे न मिळाल्याने, त्याने थेट पोलीस आपत्कालीन क्रमांक 112 डायल करून तक्रार केली.
मुलाने फोन करून तक्रार केली की, 20 रुपयांच्या कुरकुरेसाठी पैसे मागितल्यावर त्याची आई आणि बहिणीने त्याला दोरीने बांधले आणि मारहाण केली. तक्रार केल्यानंतर हा मुलगा रडू लागला. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला प्रेमाने धीर दिला आणि त्याला त्वरित मदत मिळेल, असे आश्वासन दिले.
पाहा Video
(नक्की वाचा- Railway News: प्रवासी 6 तास बाथरूममध्ये; रेल्वे कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला, समोर जे दिसलं ते पाहून सर्वच थक्क)
या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया यावर येत आहेत.
तक्रार मिळताच डायल 112 चे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती शांतपणे हाताळली. पोलिसांनी मुलाला आणि त्याच्या आईला एकत्र बोलावून त्यांचे समुपदेशन केले. त्यांनी आईला मुलाला मारहाण न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी त्या मुलाला कुरकुरे विकत घेऊन दिले. पोलीस कर्मचाऱ्यांनी लहान मुलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता, संवेदनशीलपणे प्रकरण हाताळल्याबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.