जाहिरात

LIC इमारतीतील 'ती' आग 'अपघात' नव्हे 'हत्या'! महिला मॅनेजरला सहकाऱ्यानेच जिवंत जाळले; धक्कादायक खुलासा

एका महिला अधिकाऱ्याच्या मृत्यूचे गूढ उकलले असून, त्यांच्याच सहकाऱ्याने प्रलंबित फायलींचा घोटाळा लपवण्यासाठी हे भीषण कृत्य केल्याचे समोर आले आहे.

LIC इमारतीतील 'ती' आग 'अपघात' नव्हे 'हत्या'! महिला मॅनेजरला सहकाऱ्यानेच जिवंत जाळले; धक्कादायक खुलासा

तामिळनाडू येथील मदुराईत गेल्या महिन्यात वेस्ट वेली स्ट्रीटवरील LIC इमारतीत लागलेल्या आगीच्या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. वरिष्ठ शाखा व्यवस्थापक ए. कल्याणी नम्बी यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांचे सहकारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी डी. राम यांना अटक केली आहे.

एलआयसी (LIC) इमारतीमध्ये गेल्या महिन्यात लागलेली आग हा अपघात नसून एक थंड डोक्याने केलेला खून असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एका महिला अधिकाऱ्याच्या मृत्यूचे गूढ उकलले असून, त्यांच्याच सहकाऱ्याने प्रलंबित फायलींचा घोटाळा लपवण्यासाठी हे भीषण कृत्य केल्याचे समोर आले आहे.

बनाव रचला, पण सत्य समोर आलेच

17 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर राम याने पोलिसांना सांगितले होते की, एका मुखवटाधारी व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने कार्यालयात शिरून आग लावली. कल्याणी यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर राम स्वतः किरकोळ भाजला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात राम याने रचलेला हा बनाव फसला.

(नक्की वाचा-  Sambhajinagar Crime: "मी आता थकलोय...", सावकारी जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; VIDEO शूट करत म्हटलं...)

रामच्या केबिनमधून पेट्रोल भरलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि दुचाकीतून पेट्रोल काढण्यासाठी वापरलेली नळी जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान रामने दिलेल्या जबाबांमध्ये वारंवार तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. कल्याणी यांनी त्या रात्री मुलाला फोन करून पोलिसांना कळवण्यास सांगितले होते, हा पुरावा निर्णायक ठरला.

हत्येमागचे कारण, 'डेथ क्लेम'चा घोळ

काही विमा एजंटनी कल्याणी यांच्याकडे तक्रार केली होती की, राम याने 40 हून अधिक 'डेथ क्लेम्स' (मृत्यू दावे) प्रलंबित ठेवले आहेत. कल्याणी यांनी याबाबत रामला जाब विचारला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणार असल्याचे सांगितले. आपला भ्रष्टाचार उघड होईल या भीतीने रामने कल्याणी यांचा काटा काढण्याचे आणि फायली जाळून टाकण्याचे ठरवले.

(नक्की वाचा-  मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

आरोपीने कसा रचला कट?

रात्री 8.30 च्या सुमारास रामने इमारतीचा मुख्य वीजपुरवठा बंद केला आणि दुरुस्तीसाठी वीज बोर्डाला खोटा ईमेल पाठवला. कल्याणी बाहेर पडू नयेत म्हणून त्याने मुख्य काचेच्या दरवाजाला साखळी लावून कुलूप ठोकले. त्यानंतर पेट्रोल ओतून आग लावली. कल्याणी मदतीसाठी ओरडत असताना रामने त्यांच्यावर पेट्रोल ओतून आग आणखी भडकवली. त्यानंतर स्वतःच्या केबिनलाही आग लावून याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, ज्यात तो स्वतः थोडा भाजला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com