लग्नाच्या वऱ्हाडातून चुकलेल्या एका तरुणाला खांबाला बांधून लाठ्या-काठ्याने जबर मारहाण करण्यात आली. चोर असल्याच्या संशयावरुन तरुणाला ही मारहाण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया येथील ही घटना आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तारकुलवा येथील पाथरदेव नगर पंचायत शहरातील सिनेमा रोडवर असलेल्या एका गेस्ट हाऊसमध्ये गोरखपूर येथून लग्नाची मिरवणूक आली होती. मारहाण झालेला तरुण लग्नातील पाहुण्यांसोबत या लग्न मिरवणुकीत आला होता.
(नक्की वाचा - बंद खोलीत पायलट तरुणीचा मृतदेह, बॉयफ्रेंडला अटक; अंधेरीत काय घडलं?)
मद्यधुंद अवस्थेत हा तरुण रात्री लग्नाच्या मिरवणुकीतून रस्ता चुकला आणि लगतच्या कुचाया वॉर्ड क्रमांक 5 मधील एका व्यक्तीच्या घरी पोहोचला. तेथे तो गेट जोरजोरात ठोठावू लागला. मात्र घरातील एका व्यक्तीने दरवाजा उघडून अज्ञात तरुणाला पाहिले असता त्याने 'चोर चोर' ओरडण्यास सुरुवात केली. या परिसरात एक दिवसापूर्वी चोरी झाली होती. हा आवाज ऐकून प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.
शेजाऱ्यांनी आधी तरुणाला पकडले, नंतर त्याचे हात पाय दोरीने विजेच्या खांबाला बांधले आणि लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी त्या तरुणाला त्याच्याबद्दल विचारले, मात्र तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने तो काय बोलतोय हे कोणालाच समजले नाही. तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही वेळातच कुणीतरी याची माहिती तारकुलवा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तरुणाची सुटका करून त्याला पोलीस ठाण्यात नेले.
(नक्की वाचा - क्रुरतेचा कळस! शेजाऱ्याकडून 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; खळबळजनक घटना)
मारहाणीमुळे तरुण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना दिली असता कुटुंबीयांनी सकाळी तारकुलवा पोलीस ठाणे गाठून तरुणाची सुटका करून त्याला घरी नेले. पोलिस तपासातही हे प्रकरण चोरीचे नसल्याचे देखील स्पष्ट झाले.