- केंद्र सरकार मॉडेल टेनन्सी ॲक्ट २०२५ संपूर्ण देशात लागू करणार असून भाडेकरूंसाठी मोठा दिलासा देणार आहे
- अनामत रकमेवर मर्यादा ठेवण्यात आली आहे.
- प्रत्येक भाडेकरार लेखी स्वरूपात करणे आवश्यक असेल.
देशातील लाखो लोक भाड्याच्या घरात राहतात. त्यांना अनेकदा घरमालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी 6 महिन्यांचे अनामत शुल्क (Security Deposit) मागितले जाते, तर कुठे लेखी करार नसतानाही भाडे वाढवले जाते. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार आता 'मॉडेल टेनन्सी ॲक्ट 2025' (Model Tenancy Act) देशभरात लागू करण्यावर भर देत आहे. यातून भाडेकरूना दिलासा मिळणार आहे. तर घर मालकांच्या मनमानीला आळा ही बसणार आहे. केंद्र सरकारचा हा कायदा संपूर्ण देशात लागू होणार आहे.
सुरक्षितता आणि स्पष्टतेसाठी नवीन नियम
नवीन भाडे नियमांनुसार, अनामत रकमेवर मर्यादा येईल. भाडे मनमानी पद्धतीने वाढवता येणार नाही. तसेच कोणत्याही ठोस कारणाशिवाय भाडेकरूला घरातून बाहेर काढता येणार नाही. हा कायदा सामान्य भाडेकरूंसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे. या कायद्यामुळे भाड्याची संपूर्ण प्रक्रिया अधिक स्पष्ट, सुरक्षित आणि पारदर्शक होईल. भाडेकरूसाठी हा दिलासा देणारा निर्णय असला तरी घर मालकांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. त्यामुळे त्या या निर्णयाकडे कशा पद्धतीने पाहातात हे पाहावं लागणार आहे.
अनामत रकमेवर कठोर मर्यादा
नवीन नियमांनुसार, घरमालकांना आता त्यांच्या इच्छेनुसार अनामत रक्कम मागता येणार नाही. निवासी घरांसाठी (Residential Houses) जास्तीत जास्त 2 महिन्यांचे भाडे इतकीच अनामत रक्कम ठेवता येईल. व्यावसायिक जागांसाठी (Commercial Places) ही मर्यादा 6 महिन्यांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामुळे घर भाड्याने घेताना भाडेकरूंवरील आर्थिक ताण कमी होईल.
लेखी करार, नोंदणी आणि वाढीचे नियम
लेखी करार आवश्यक:
मॉडेल टेनन्सी ॲक्टनुसार, प्रत्येक भाडेतत्त्वासाठी लेखी भाडे करार (Rent Agreement) करणे अनिवार्य आहे. भाडे, भाडेवाढ, दुरुस्तीची जबाबदारी आणि भाड्याचा कालावधी हे सर्व करारात स्पष्ट नमूद असेल. कराराच्या 60 दिवसांच्या आत तो 'रेंट अथॉरिटी'कडे जमा करणे बंधनकारक आहे.
डिजिटल नोंदणी:
राज्यांनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे, जिथे भाडे करार ऑनलाइन नोंदणीकृत होतील. हा नोंदणीकृत करार कायदेशीररित्या ग्राह्य धरला जाईल.
भाडेवाढीचे नियम:
घरमालक आता मनमानीने भाडे वाढवू शकणार नाहीत. भाडेवाढ केवळ लेखी करारात नमूद केल्याप्रमाणेच होईल. तसेच, भाडेवाढ करण्याच्या 3 महिने आधी भाडेकरूला लेखी सूचना देणे अनिवार्य आहे.
वाद निवारण आणि बेदखल करण्याचे नियम
मनमानी बेदखली नाही:
घरमालक आता भाडेकरूला त्यांच्या मर्जीनुसार घराबाहेर काढू शकत नाहीत. यासाठी 'रेंट अथॉरिटी'चा आदेश आवश्यक असेल. भाडे न देणे, अवैध कृत्य करणे किंवा परवानगीशिवाय जागा दुसऱ्याला भाड्याने देणे, हीच कारणे कायद्यात नमूद आहेत.
विवाद लवकर मिटणार:
नवीन कायद्यात विवादांच्या निवारणासाठी 3 स्तरांची यंत्रणा (रेंट अथॉरिटी, रेंट कोर्ट आणि रेंट ट्रिब्यूनल) दिली आहे. यामुळे भाड्याशी संबंधित प्रकरणे 60 दिवसांत निकाली काढण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे दिर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेतून मुक्ती मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world