रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल, तर तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल. काही ठिकाणी रस्ते दिव्यांच्या प्रकाशाने चकाचक असतात तर काही किलोमीटरचा पट्टा असा असतो जिथे पूर्ण अंधार असतो. अशा वेळी प्रवाशांच्या मनात अनेकदा प्रश्न निर्माण होतो की, सरकार एवढा टोल टॅक्स वसूल करते, तरीही संपूर्ण हायवेवर लाईट्स का लावत नाही? यावर NHAI स्पष्टीकरण दिले आहे. यामागचे कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
NHAI ने दूर केला गैरसमज
भारतात सध्या जागतिक दर्जाच्या एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वेगाने पसरत आहे. दरम्यान, संपूर्ण हायवे प्रकाशमय ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे, असा एक समज नागरिकांमध्ये आहे. यावर स्पष्टीकरण देताना NHAI ने सांगितले की, संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर सलग लाइटिंग देणे कायदेशीर नियमांनुसार अनिवार्य नाही आणि ते व्यावहारिकदृष्ट्याही शक्य नाही.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
काय सांगतो सरकारी कायदा?
महामार्गांवर लाईट्स लावण्याचे नियम मनमानी पद्धतीने ठरवले जात नाहीत. भारतात रस्त्यांचे डिझाइन आणि पायाभूत सुविधांचे मानक ठरवणारी सर्वोच्च संस्था 'इंडियन रोड्स कांग्रेस' च्या तांत्रिक मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारेच हे निश्चित केले जाते. आयआरसीच्या नियमांनुसार, राष्ट्रीय महामार्गावर केवळ अशाच ठिकाणी दिवे लावणे बंधनकारक आहे, जिथे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघात रोखण्यासाठी प्रकाश असणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
नियम काय सांगतो?
NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, खालील हाय-रिस्क (High-Risk) किंवा जास्त रहदारीच्या क्षेत्रांमध्येच स्ट्रीट लाईट्स लावणे कायद्याने बंधनकारक आहे.
- सर्व टोल प्लाझा आणि त्यांच्या आसपासचा परिसर.
- इंटरचेंज, मोठे चौक आणि प्रमुख जंक्शन्स.
- सर्व उड्डाणपूल (Flyovers) आणि भुयारी मार्ग.
- महामार्गालगतचे नागरी किंवा अर्ध-नागरी भाग, जिथे पादचाऱ्यांची वर्दळ असते.
- बस बे आणि ट्रकसाठी असणारे ले-बाई.
- अपघात प्रवण क्षेत्र आणि अति-जड वाहतुकीचे पट्टे.
संपूर्ण हायवेवर लाईट्स न लावण्याची मुख्य कारणे
हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर सलग स्ट्रीट लाईट्स लावल्यास, त्यांच्या देखभालीचा आणि दुरुस्तीचा खर्च अवाढव्य असेल. हा खर्च आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो. सलग लाईट्समुळे विजेचा वापर प्रचंड वाढेल. परिणामी कार्बन फूटप्रिंट वाढून पर्यावरणाला मोठा फटका बसेल. तसेच रात्रीच्या वेळी वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासालाही बाधा पोहोचते.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)
थेट लाईट्स नसतानाही प्रवास कसा सुरक्षित राहतो?
- रिफ्लेक्टिव सायनेज: रस्त्याच्या कडेला असणारे चमकणारे माहिती फलक.
- रोड मार्किंग्स: रस्त्यावर मारलेल्या चमकदार पट्ट्या.
- रोड रिफ्लेक्टर्स: रस्त्याच्या मधोमध असणारे 'कॅट्स आय' रिफ्लेक्टर्स.
हे सर्व फीचर्स तुमच्या वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश पडताच चमकून उठतात आणि चालकाला रस्ता दाखवण्यास मदत करतात. त्यामुळे रात्रीच्या सुरक्षित प्रवासासाठी संपूर्ण हायवेवर दिव्यांची गरज नसून, वाहनांचे हेडलाईट्स आणि रस्त्यावरील रिफ्लेक्टर्स पुरेसे असतात, असे NHAI ने स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world