जाहिरात

Weight Loss: एक शॉट आणि लठ्ठपणा गायब, Novo Nordisk Wegovy ची किंमत ऐकून हैराण व्हाल

Novo Nordisk Wegovy Drug: जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, विशिष्ट प्रकारचे कर्करोग आणि टाइप-2 मधुमेह सारख्या समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर 200 हून अधिक व्याधी जडू शकतात.

Weight Loss:  एक शॉट आणि लठ्ठपणा गायब, Novo Nordisk Wegovy ची किंमत ऐकून हैराण व्हाल
मुंबई:

Novo Nordisk Wegovy Drug: लठ्ठपणा केवळ चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो हा गैरसमज आहे; त्यासाठी इतरही काही घटक कारणीभूत ठरतात. लठ्ठपणाची समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठीचे प्रभावी औषध मानले जाणारे Wegovy (Novo Nordisk Wegovy Drug) हे औषध भारतामध्ये सर्वसामान्यांच्या उपयोगासाठी आणण्यात आले आहे. डॅनिश फार्मास्युटिकल कंपनी नोवो नॉर्डिस्कने याबाबतची घोषणा केली असून या औषधाची किंमत भारतामध्ये किती असेल याची उत्सुकता होती. याचेही उत्तर कंपनीने दिले आहे. 

लठ्ठपणा भारतात मोठी समस्या

भारतात लठ्ठपणा ही एक मोठी आरोग्य समस्या आहे, लठ्ठपणामुळे भारतातील अनेकांना त्रास सहन करावा लागतो. एका अभ्यासानुसार 25.4 कोटी भारतीय लठ्ठ आहेत तर 35.1 कोटी भारतीयांना गरगरीत ढेरी आहे.

जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, विशिष्ट प्रकारचे कर्करोग आणि टाइप-2 मधुमेह सारख्या समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर 200 हून अधिक व्याधी जडू शकतात.

नोवो नॉर्डिस्कचे वेगोवी औषध (Novo Nordisk Wegovy Drug) हे इंजेक्शनद्वारे शरीरात सोडले जाते. या औषधामध्ये असलेला सेमॅग्लुटाइड  (Semaglutide) हा घटक लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो.  0.25 mg, 0.5 mg, 1 mg, 1.7 mg आणि 2.4 mg अशा पाच मात्रेमध्ये हे औषध उपलब्ध होणार आहे. 

Wegovy औषधाची किंमत खालीलप्रमाणे आहे

  • 0.25 मिग्रॅ, 0.5 मिग्रॅ आणि 1 मिग्रॅ साठी-17,345 रु 
  • 1.7 मिग्रॅ साठी-24,280  रु 
  • 2.4 मिग्रॅ साठी-26,015  रु  

हे औषध आठवड्यातून एकदाच घ्यायचे औषध असून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेता येते.  लठ्ठपणामुळे हृदयविकाराची शक्यता बळावते,सोबतच मधुमेहाचाही धोका वाढतो. हे औषध लठ्ठपणासोबतच हे दोन धोके कमी करण्यासही मदत करते. लठ्ठपणा आणि त्यासोबत येणाऱ्या व्याधींचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारतामध्ये उपलब्ध असलेले हे एकमेव औषध आहे.  या औषधामुळे लठ्ठपणाने ग्रासलेल्या आणि त्रासलेल्या अनेकांना फायदा होणार आहे. 

वेगोवी काम कसं करतं?

वेगोवी हे GLP-1 रिसेप्टर एगोनिस्ट आहे. साध्या भाषेत सांगायचे तर हे औषध भूक लागल्याची भावना कमी करण्यास मदत करते, भूक कमी लागल्याने अन्न कमी खाल्ले जाते आणि पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सोबतच हे औषध रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणाऱ्या इन्सुलिनलाही सक्रीय करते. या सगळ्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.  सेमॅग्लुटाइड हा ओझेंपिक (Ozempic) आणि वेगोवी या दोन्ही औषधांमधील सामायिक घटक आहे. ओझेंपिकचा उपयोग टाइप 2 मधुमेहावर उपचार करण्यासाठी केला जातो, तर वेगोवीचा उपयोग लठ्ठपणासोबतच मधुमेह, हृदयिकाराची समस्या सोडवण्यास होतो.   

लठ्ठपणा ही महामारी आहे

नोवो नॉर्डिस्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिय म्हणाले, "लठ्ठपणा ही केवळ त्या व्यक्तीला असलेली आरोग्याची समस्या नसून तो एक आजार आहे. या आजाराने राष्ट्रीय महामारीचे रुप धारण केले आहे आणि याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाहीये. त्यामुळे आम्हाला हे औषध भारतामध्ये लाँच करताना आनंद होत आहे. हे औषध पेनसारख्या इंजेक्शनने शरीरात सोडणे सोपे आहे. या औषधाच्या तीन डोससाठीची किंमत एकसमान ठेवण्यात आली आहे, जेणेकरून ती अनेकांना परवडू शकेल. "

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com