ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणात चिकन आणि पालकाची भाजी खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याने एका 52 वर्षीय महिलेसह तिच्या दोन तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण आसनाबानी गावावर शोककळा पसरली आहे.
जेवण बनले विष
मिळालेल्या माहितीनुसार, कांटाबानिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसनाबानी गावात राहणाऱ्या साहू कुटुंबात ही दुर्घटना घडली. रविवारी रात्री गोलाप साहू आणि त्यांची दोन मुले भरत आणि लितू यांनी रात्रीच्या जेवणात चिकन, पालक आणि भात खाल्ला होता. जेवण झाल्यानंतर काही वेळातच या तिघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती वेगाने खालावल्याने सोमवारी सकाळपर्यंत या तिघांचाही मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलयचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
पोलिसांकडून तपास सुरू
एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूची बातमी समजताच स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घरातील उरलेल्या अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अन्नामध्ये विषबाधा नेमकी कशामुळे झाली? चिकन खराब होते की पालक किंवा बनवण्याच्या पद्धतीत काही त्रुटी होती? याचा सखोल तपास सुरू आहे.
गावात दहशतीचे वातावरण
या घटनेनंतर आसनाबानी आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अवघ्या काही तासांत दोन तरुण मुलांसह आईचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ हादरून गेले आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अन्नाची स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.