देशातील सर्वात कठीण परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल समोर आला आहे. यात यश मिळवणं कठीण असतं. त्यातही पहिल्या तीन क्रमांकात येण्याचा आनंद वेगळाच असतो. UPSC च्या परीक्षेत अनिमेष प्रधान याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मात्र त्याला हे यश मिळवणं सोपं नव्हतं. अनेक आव्हानं असतानाही केवळ दृढसंकल्प आणि सातत्याच्या जोरावर त्याने आपलं ध्येय गाठलं.
अनिमेष प्रधान ओरिसातील आहे. त्याने NIT राऊरकेलामधून कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं. यानंतर त्याने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये काम सुरू केलं होतं. नोकरी करीत असताना तो युपीएससीची तयारी करीत होता.
आई-वडिलांचं निधन...
अनिमेषचं जीवन आव्हानात्मक होतं. तो अकरावीत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर तो युपीएससीची तयारी करीत असताना त्याच्या आईला कर्करोगाचं निदान झालं आणि यातच त्यांचंही निधन झालं. या सर्व गोष्टी त्याच्या युपीएससी तयारीदरम्यान घडल्या. मात्र तो मागे हटला नाही. त्याने आपल्या आईच्या उपचारासह अभ्यास सुरू ठेवला. अनिमेषने IAS व्हावं हे त्याच्या आईचं स्वप्न होतं. आईच्या निधनानंतर आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत केली. अनिमेष सांगतो की, केवळ परीक्षा यशस्वी होणं हेच माझं ध्येय नव्हतं, तर हा सर्व खटाटोप माझ्या आईच्या त्यागासाठीही होता.
हे ही वाचा-केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला
नोकरी करीत असताना अभ्यास...
नोकरी करीत असताना अनिमेष युपीएससीची तयारीही करीत होता. सकाळी लवकर उठून तीन ते साडे तीन तास अभ्यास करीत होता. कामावरुन आल्यानंतरही काही तास अभ्यासाला बसायला. सातत्य हेच माझ्या यशाचं खरं कारण असल्याचं अनिमेष सांगतो. काहीही झालं तरी मी दररोज अभ्यास करीत होता. कधीच टाळाटाळ केली नाही, असं अनिमेष सांगतो.
हे ही वाचा- कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं?
केंद्रीय लोकसेवेचा निकाल जाहीर..
केंद्रीय लोकसेवा परीक्षेत 1,016 उमेदवार उत्तीर्ण झाले असून यामध्ये 664 पुरुष आणि 352 स्त्रियांचा समावेश आहे. लखनऊच्या आदित्य श्रीवास्तवने केंद्रीय लोकसेवा परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे. यंदाच्या निकालानुसार, एकूण यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 87 उमेदवार आहेत. मात्र निकालाकडे दृष्टी टाकली तर मराठी उमेदवारांची संख्या कमी झाल्याचं दिसून येतंय.