काहीतरी मोठं घडणार असल्याचं वाटू लागलं आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवा अशी भावना देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाली आहे. पाकिस्तानला धडा शिकवला जाणार हे निश्चित आहे मात्र तो कधी आणि कसा याचा अंदाज अजून लागत नाही. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकामागोमाग एक महत्त्वाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, तीनही सैन्यांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या सात दिवसांत एकामागोमाग एक उच्चस्तरीय बैठका आयोजित केल्या गेल्या आहेत. मंगळवारी पहिले पॅरा मिलिट्री प्रमुखांसोबत गृहमंत्रालयात एक बैठक पार पडली. त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पोहोचले. त्यापाठोपाठ परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर, एनएसए अजित डोभाल तीनही सीडीएस अनिल चौहान आणि तीनही सैन्यदलांचे प्रमुखही पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधानांनी बोलताना म्हटले होते की पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधानांनी हल्ल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये या हल्ल्याला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडणार नाही असे जाहीर केले आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले जातील असा इशाराही त्यांनी दिला होता.
नक्की वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील 50 पर्यटन स्थळ बंद, वाचा संपूर्ण यादी
मंगळवारी दुपारी झालेल्या गृह मंत्रालयाच्या बैठकीत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, बीएसएफ, आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे महासंचालक सहभागी झाले होते. याशिवाय, गृह मंत्रालयाच्या महत्त्वाच्या बैठकीत CRPF, SSB आणि CISF वरिष्ठ अधिकारीही पोहोचले होते. मंगळवारी पार पडलेल्या गृह मंत्रालयाच्या या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सीसीएसची बैठक घेणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीसीएसची दुसऱ्यांदा बैठक होणार आहे. सीसीएस बैठकीनंतर बुधवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीपीए (कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स) ची बैठकही होणार आहे.
सोमवारी पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात एक बैठक झाली होती. ही बैठक सुमारे 40 मिनिटे चालली होती. या बैठकीनंतर काहीवेळाने भारत आणि फ्रान्स यांच्यात नौदलासाठी 26 राफेल सागरी विमानांचा करार झाला होता.
सैन्य दल प्रमुख आणि संरक्षणमंत्र्यांची बैठक
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सैन्य दलाचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्यात बैठक पार पडली होती. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी सैन्य दल प्रमुखांकडून सैन्याची तयारी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उचललेल्या पावले आणि सीमेवरील स्थिती याचा आढावा घेतला होता.