जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. दहशतवादी संघटना लष्कर ए तोएबाशी संलग्न कँपने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा या हल्ल्यातील सहभाग प्रकर्षाने समोर आला होता.
या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांना दहशतवाद्यांनी गोळी घालून ठार मारलं होतं. या खडतर प्रसंगात संपूर्ण राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला आपला पाठींबा देत पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी पाठींबा दिला होता. भारतीय सैन्यानेही या कारवाईला सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई करत ऑपरेशन सिंदूर फत्ते करत 26 निष्पाप भारतीयांच्या हत्येचा बदला घेतला आहे.
केंद्र सरकारतर्फे दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर झालेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने भारतात हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे. भारतीय सैन्याने या कारवाईत दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर कारवाई केली आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या तळावर कारवाई नाही - भारतीय सैन्याचं स्पष्टीकरण
केलेल्या कारवाईबद्दल माहिती देताना भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही तळावर हल्ला चढवला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. हल्ल्याचं स्थळ निवडताना भारताने कमालीचा संयम दाखवून फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
पहलगामध्ये निष्पाप भारतीयांच्या हत्येस जबाबदार असलेल्या अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. या हल्ल्यातील अधिकचे तपशील केंद्र सरकारतर्फे आज दिले जाणार आहेत.
दरम्यान पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर दोन आठवड्यांच्या कालावधीत भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर चारही बाजूंनी पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले, ज्यात भारताला यशही मिळालं. सिंधू जल कराराला स्थगिती देण्यापासून ते पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यापर्यंत भारताने सर्व पावलं उचलली. यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमुळे दहशतवादी हल्ल्यात आपला प्राण गमावलेल्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.