79th Independence Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. आपल्या 12 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी भारताला 2027 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पावर भर दिला. सेमीकंडक्टरपासून ते जेट इंजिन बनवण्यापर्यंत आणि आण्विक ऊर्जा क्षमता दहा पटीने वाढवण्यापासून ते युवकांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या रोजगार योजनेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
PM मोदींनी केलेल्या मोठ्या घोषणा
सेमीकंडक्टर: ‘मेड इन इंडिया चिप'ची निर्मिती
गेल्या 50-60 वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर फॅक्टरी सुरू करण्याचे प्रयत्न कसे अयशस्वी झाले, याची आठवण करून देत पंतप्रधान मोदींनी आता भारत मिशन मोडमध्ये असल्याचे सांगितले. या वर्षाच्या अखेरीस देशात पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप तयार केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
( नक्की वाचा: 'दिवाळीत देशवासियांसाठी मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरुन PM मोदींची ऐतिहासिक घोषणा! )
अणुऊर्जा क्षमता 2027 पर्यंत दहापट वाढणार
पुढील दोन दशकांत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता दहा पटीने वाढवण्याच्या उद्दिष्टाने 10 नवीन अणुभट्ट्यांवर काम सुरू असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. यामुळे ऊर्जा क्षेत्रात भारत अधिक आत्मनिर्भर बनेल.
जीएसटी सुधारणा
पंतप्रधानांनी 'नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स'ची घोषणा केली. हे सुधारित कायदे दिवाळीच्या मुहूर्तावर लागू केले जातील. ज्यामुळे अत्यावश्यक वस्तूंवरील कर कमी होतील. याचा लाभ लघु-मध्यम उद्योजक, स्थानिक विक्रेते आणि ग्राहकांना मिळेल.
10 लाख कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेसाठी टास्क फोर्स
2047 पर्यंत भारताला 10 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी 'रिफॉर्म टास्क फोर्स' स्थापन केली जाईल, असे मोदींनी जाहीर केले. याचे उद्दिष्ट आर्थिक विकासाला गती देणे, लाल फितीचा कारभार कमी करणे आणि प्रशासनाचे आधुनिकीकरण करणे आहे.
'पीएम विकसित भारत रोजगार योजना'
पंतप्रधान मोदींनी युवकांसाठी 1 लाख कोटी रुपयांची 'पीएम विकसित भारत रोजगार योजना' सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत 3 कोटी तरुणांना दरमहा 15000 रुपये दिले जातील.
( नक्की वाचा: PM मोदींनी GST बद्दल केलेल्या घोषणांचा अर्थ काय? कोणत्या वस्तू स्वस्त होणार? )
'हाय-पॉवर्ड डेमोग्राफी मिशन'ची सुरुवात
सीमावर्ती भागातील घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय असंतुलनावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी 'हाय-पॉवर्ड डेमोग्राफी मिशन' सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली.
ऊर्जा स्वातंत्र्य आणि ‘समुद्र मंथन'
भारताच्या मोठ्या अर्थसंकल्पाचा मोठा हिस्सा पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात करण्यासाठी खर्च होत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी 'राष्ट्रीय डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन' सुरू करण्याची घोषणा केली. या मिशनद्वारे समुद्रातील संसाधनांचा उपयोग केला जाईल.
‘मेड इन इंडिया' जेट इंजिन
पंतप्रधानांनी वैज्ञानिक आणि तरुणांना 'मेड इन इंडिया' जेट इंजिन बनवण्याचे थेट आव्हान दिले. ज्याप्रमाणे कोविडच्या काळात लस आणि डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय (UPI) तयार केले. त्याचप्रमाणे आपण स्वतःची जेट इंजिन तयार करावी, असे ते म्हणाले.