
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई हिराबेन यांच्याबद्दलच्या एका कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व्हिडिओवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिहार काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आई हिराबेन यांच्यातील काल्पनिक संवाद दाखवला आहे, ज्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
काँग्रेसने जारी केलेल्या या एआय व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी झोपलेले आहेत आणि त्यांची आई त्यांना येऊन ओरडत असल्याचे दाखवले आहे. "अरे बेटा, आधी तू मला नोटाबंदीसाठी लांब रांगेत उभे केलेस, नंतर माझे पाय धुण्यासाठी रील बनवलीस आणि आता तू बिहारमध्ये माझ्या नावाने राजकारण करत आहेस. तू माझा अपमान करणारे बॅनर आणि पोस्टर्स छापत आहेस. तू पुन्हा बिहारमध्ये तेच करण्याचा प्रयत्न करत आहेस. राजकारणाच्या नावाखाली तू किती खालच्या पातळीवर जाणार आहेस?" या संभाषणानंतर पंतप्रधान मोदी जागे होतात.
(नक्की वाचा : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा पुरावा: 'हैदराबाद' आणि 'सातारा' गॅझेटियर नेमकं काय आहे?)
भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेसच्या या व्हिडिओवर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी या व्हिडिओला ‘पंतप्रधानांच्या आईचा, महिलांचा आणि गरिबांचा अपमान' म्हटले आहे. “काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या आईचा अपमान केला आहे. ही आता गांधींची काँग्रेस राहिली नाही”, असे पूनावाला म्हणाले. भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनीही काँग्रेसला या व्हिडिओबद्दल लाज वाटायला पाहिजे असे म्हटले. “काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या आईचा, ज्या आता या जगात नाहीत, त्यांचा अपमान केला आहे. काँग्रेसने या व्हिडिओबद्दल माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
(नक्की वाचा- CJI Bhushan Gawai: 'ते' न्यायमूर्ती खटल्यादरम्यान चित्र काढत बसायचे, सरन्यायाधीशना सांगितला किस्सा)
गेल्या महिन्यातही राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील बिहारमधील 'वोटर अधिकार यात्रा' दरम्यान दरभंगा येथील एका कार्यक्रमात काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळीही भाजपने काँग्रेसवर टीका केली होती. त्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनीही दुःख व्यक्त केले होते.