International Women's Day निमित्त या महिलांनी सांभाळले PM मोदींचे सोशल मीडिया अकाउंट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत वैशालीने म्हटलंय की, मी खूप आनंदी आहे कारण आपल्या PM मोदीजींचे सोशल मीडिया अकाउंट सांभाळत आहे, तेही महिना दिनाच्या दिवशी..."

जाहिरात
Read Time: 3 mins

International Women's Day 2025: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू, शास्त्रज्ञ एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी यांनी शनिवारी (8 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'एक्स' हँडल सांभाळले. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या महिलांनी PM मोदी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्यांच्याबाबतची माहिती पोस्ट केली. पंतप्रधान मोदींनी याबाबत वचन दिले होते की विविध क्षेत्रामध्ये ज्या महिला स्वतः ओळख निर्माण करत आहेत, त्या सर्व महिला दिनी PM मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करतील. वैशालीने PM मोदींच्या एक्स अकाउटंवर पोस्ट करत म्हटलं की, या संधीमुळे खूप आनंदी आहे आणि देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले याचाही अभिमान वाटतोय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त त्यांच्या वचनाचा पुनरुच्चार करत 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, महिला दिनी आम्ही आमच्या नारी शक्तीला सलाम करतो. आमच्या सरकारने नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले आहे, जे आमच्या योजना आणि कार्यक्रमांमध्ये दिसून येते. आज वचन दिल्याप्रमाणे माझे सोशल मीडिया अकाउंट विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या महिला सांभाळतील. हे वचन पूर्ण करत शनिवारी (8 मार्च 2025) वैशालीने पंतप्रधानांच्या 'एक्स' हँडलवर पोस्ट शेअर केलीय.

Advertisement

वैशालीने दिला खास संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियावर पोस्ट करत वैशालीने लिहिलं की, नमस्कार मी वैशाली आणि मला प्रचंड आनंद होत आहे की महिला दिनी मी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सोशल मीडिया अकाउंट सांभाळत आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की मी बुद्धिबळ खेळते आणि अनेक स्पर्धांमध्ये माझ्या प्रिय देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा मला खूप अभिमान आहे".

Advertisement

(नक्की वाचा: International Women's Day 2025 Wishes: नारीशक्तीला सलाम, महिला दिनानिमित्त पाठवा खास मेसेज)

पुढे तिने म्हटलंय की, माझा जन्म 21 जूनला झालाय. हा दिवस आता योगायोगाने आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जातो. मी 6 वर्षांची असल्यापासून बुद्धिबळ खेळत आहे. या प्रवासात मला बरेच काही शिकायला मिळाले आणि आयुष्यात त्याचा फायदाही झाला. कित्येक स्पर्धा आणि ऑलिंपियाड यशांमध्ये ते दिसूनही आलंय. पण अजून खूप काही करायचे बाकी आहे.”

Advertisement

वैशालीने पोस्टमध्ये महिलांकरिता खास संदेश दिलाय की, मला सर्व महिलांना विशेषतः तरुणींना सांगायचंय की मार्गात कितीही अडथळे आले तरी तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. तुमचा उत्साह तुमच्या यशाची ताकद बनेल.  महिलांना कोणत्याही क्षेत्रात त्यांच्या स्वप्नांचे अनुसरण करण्यास आणि अडथळे पार करण्यास मला प्रोत्साहित करायचे आहे, कारण मला माहिती आहे की त्या हे करू शकतात."

स्वतःच्या महत्त्वाकांक्षाबाबत सांगताना तिने म्हटलं की, मला स्वतःची एफआयडीई रँकिंग अधिक सुधारायचीय आणि देशाला अधिक अभिमान वाटावा, अशी कामगिरी करायचीय. बुद्बिबळ या खेळाने मला बरंच काही दिलंय आणि या खेळामध्ये अधिक योगदान देण्यासाठी मी उत्सुक आहे. याच भावनेसह मी तरुण मुलींना त्यांच्या आवडीचा कोणताही खेळ निवडण्यास सांगू इच्छिते. खेळ हा सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक आहे."

(नक्की वाचा: Women's Day 2025: आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? वाचा इतिहास)

वैशालीने पालकांसह भावंडांनाही आवाहन करत म्हटलंय की, "मुलींना पाठिंबा द्या. त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, त्या चमत्कारी कामगिरी करुन दाखवतील. माझ्या जीवनात माझ्या पालकांचे खूप मोठे योगदान आहे. माझे माझ्या भावाशी खूप जवळचे नाते आहे. मला माझे प्रशिक्षक, संघातील सहकारी आणि विश्वनाथन आनंद सरांकडून मला प्रेरणा मिळते."

वैज्ञानिक एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी यांचा खास संदेश

ओडिशातील रहिवासी असणाऱ्या एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, भारत देश हा विज्ञानासाठी सर्वात जीवंत स्थान आहे. त्यांनी जास्तीत जास्त महिलांना या क्षेत्रास स्वीकारण्याचे आवाहन केलंय. पुढे त्यांनी असेही म्हटलंय की, आम्हा दोघींना आमच्याशी संबंधित क्षेत्रामध्ये विस्तृत संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. अणु तंत्रज्ञानासारखे क्षेत्र भारतातील महिलांना इतक्या संधी देईल हे अकल्पनीय होते. त्याचप्रमाणे अंतराळ जगात महिला आणि खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग भारत देशाला विकासासाठी सर्वात आकर्षक ठिकाण बनवतो. भारतीय महिलांमध्ये निश्चितच प्रतिभा आहे आणि भारताकडे निश्चितच योग्य व्यासपीठ आहे."