देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुक्यातील दिवे-जाधववाडी येथील २७ वर्षीय तरुण जवान घनश्याम रायबा आढाळगे यांना हिमाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं. एका उमद्या आणि कर्तव्यदक्ष जवानाच्या निधनाने संपूर्ण पुरंदर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
घनश्याम आढाळगे २०१७ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. लहानपणापासूनच देशसेवेची ओढ असलेल्या घनश्याम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करून लष्करात प्रवेश मिळवला होता. गेल्या सात वर्षांपासून त्यांनी विविध कठीण क्षेत्रात आपली सेवा बजावली होती. दोन महिन्यांपूर्वीच ते आपल्या गावी सुट्टीवर आले होते. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवून, पुन्हा देशाच्या रक्षणासाठी ते हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित भागात कर्तव्यावर रुजू झाले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि बुधवारी त्यांच्या बलिदानाची बातमी गावी धडकली.
तरुणाच्या वीरमरणाने गावावर शोककळा...
घनश्याम हे अत्यंत शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. सुट्टीवर आल्यानंतर ते गावातील तरुणांना सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन करत असत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच दिवे परिसरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून, घराघरांत शोककळा पसरली आहे. "एक हसमुख आणि जिद्दी तरुण आपल्यातून गेला," अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता मुलगा देशासाठी शहीद झाल्यामुळे आढाळगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घनश्याम यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, प्रशासनाकडून त्याबाबतची तयारी पूर्ण करण्यात येत आहे. एका वीरपुत्राला गमावल्याची भावना आज प्रत्येक पुरंदरकराच्या मनात दाटून आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world