जाहिरात

IAS Officer Dies: माजी IASअधिकाऱ्यांचा घरातच तडफडून मृत्यू; वर्ल्ड बँकेत भारताचे केले होते प्रतिनिधित्व

दिल्लीच्या हौज खास परिसरात एका घरात एसीचा इनडोअर युनिट फुटून झालेल्या भीषण अपघातात 1968 च्या बॅचचे वरिष्ठ निवृत्त आयएएस अधिकारी धनेंद्र कुमार यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

IAS Officer Dies: माजी IASअधिकाऱ्यांचा घरातच तडफडून मृत्यू; वर्ल्ड बँकेत भारताचे केले होते प्रतिनिधित्व

दिल्लीत एका घरामध्ये एसीच्या इनडोअर युनिटमध्ये अचानक झालेल्या जोरदार स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत भारताचे ज्येष्ठ निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी धनेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे देशाच्या प्रशासकीय आणि धोरणात्मक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. भारताच्या आर्थिक धोरणांना आणि स्पर्धा कायद्याला बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

एसी फुटला आणि संपूर्ण घर आगीच्या विळख्यात 

मिळालेल्या माहितीनुसार, हौज खास येथील त्यांच्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी एसीच्या इनडोअर युनिटमध्ये अचानक तांत्रिक बिघाडामुळे प्रचंड स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण घरात विषारी धुराचे साम्राज्य पसरले आणि आग लागली. 80 वर्षीय धनेंद्र कुमार हे घरात पसरलेल्या जाड धुरात अडकल्यामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.

घटनेच्या वेळी घरात कुटुंबातील सदस्य आणि घरगुती मदतनीसांसह एकूण 5 लोक उपस्थित होते, ज्यापैकी इतर लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. शेजारी राहणाऱ्या सोनल नावाच्या महिलेने सांगितले की, एवढ्या मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या घरात आग लागूनही फायर ब्रिगेड पोहोचायला खूप वेळ लागला. पोलीस आणि क्राईम टीम या प्रकरणाची तांत्रिक तपासणी करत असून, प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून यात कोणत्याही घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येने आत्महत्या का केली? उलटसुलट चर्चांना उधाण)

जिल्हाधिकारी ते वर्ल्ड बँक

1946 मध्ये जन्मलेल्या धनेंद्र कुमार यांनी 1968 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश केला. त्यांचा प्रशासकीय प्रवास अत्यंत प्रदीर्घ आणि प्रेरणादायी होता. आपल्या सुरुवातीच्या काळात त्यांनी हरियाणाच्या कर्नाल आणि जींद जिल्ह्यांचे डेप्युटी कमिशनर (DC) म्हणून काम केले. पुढे त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, आणि संस्कृती मंत्रालयाचे सचिव म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.

जागतिक बँकेत देशाचे प्रतिनिधित्व 

नोव्हेंबर 2005 ते जानेवारी 2009 या काळात त्यांनी जागतिक बँकेत (World Bank) भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या देशांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (Executive Director) म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व केले. फेब्रुवारी 2009 ते जून 2011 या काळात त्यांनी भारतीय स्पर्धा आयोगाचे चेअरमन म्हणून काम पाहिले. त्यांच्याच कार्यकाळात देशात स्पर्धा कायदा प्रभावीपणे लागू करण्यात आला आणि मोठ्या कंपन्यांच्या एकाधिकाराला आळा घालण्यात आला.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

पंतप्रधानांकडून 'नॅशनल सिटिजन्स अवॉर्ड'ने सन्मानित

हरियाणा सरकारमध्ये मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता आणि इतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केले. 'हरियाणा स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'चे चेअरमन असताना त्यांनी राज्यात इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यासाठी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्यांना 'नॅशनल सिटिजन्स अवॉर्ड' देऊन गौरवण्यात आले होते. निवृत्तीनंतरही ते 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स'मध्ये चीफ मेंटर म्हणून सक्रिय होते. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com