
Unique Dowry : विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ आणि त्या छळातून हत्या हे प्रकार या देशात नवे नाहीत. ग्रेटर नोएडामधील निक्की या महिलेची याच पद्धतीनं हत्या करण्यात आली. या प्रकरानं संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणाचे पडसाद आता उमटत आहे. देशातील अन्य भागातूनही या प्रकारच्या घटना उघड होत आहेत. तर काही ठिकाणी यासाठी खबरदारीचे उपाय देखील शोधण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील महापंचायतीनं एक अजब निर्णय घेतलाय. त्याची सध्या चर्चा होत आहे.
या महापंचायचीनं कन्यादानात सोन्या-चांदीऐवजी मुलींना रिव्हॉल्वर आणि तलवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. बागपतच्या गौरीपूर मितली गावात ठाकूर समाजाची 'केशरिया महापंचायत' पार पडली. या पंचायतीत अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती.
पंचायतीचा नेमका निर्णय काय?
या महापंचायतीमध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष, ठाकूर कुंवर अजय प्रताप सिंह यांनी हा मोठा आणि वादग्रस्त निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की, "आपण जुन्या परंपरा विसरत आहोत. आज कन्यादानात आपण मुलींना सोने, चांदी आणि पैसे देतो. पण, ती हे दागिने घालून बाहेर गेली, तर तिला लुटले जाते किंवा तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते."
( नक्की वाचा : School Teacher : शिक्षिकेने तीन वर्षांच्या मुलीसह स्वतःला पेटवले, शेवटच्या पत्रात सासू, सासऱ्यांचा उल्लेख )
ते पुढे म्हणाले, "आजच्या काळात, आपल्या मुली सुरक्षित राहाव्यात यासाठी त्यांना सोन्या-चांदीऐवजी कट्यार, तलवार किंवा रिव्हॉल्वर दिली पाहिजे. रिव्हॉल्वर महाग असेल तर कट्यार द्यावी. कारण, ती आपली मुलगी आहे आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे."
सुरक्षेची नवी व्याख्या की नवीन प्रश्न?
या पंचायतीचा हा निर्णय जरी महिलांच्या सुरक्षेच्या चिंतेतून घेण्यात आला असला, तरी त्याने अनेक नवीन प्रश्न निर्माण केले आहेत. एका बाजूला, हा निर्णय महिलांवरील अत्याचाराबद्दल समाजाची वाढती चिंता दर्शवतो, तर दुसऱ्या बाजूला, महिलांच्या हातात शस्त्रे देणे हाच एकमेव उपाय आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world