मोदी, योगींना अडकवण्याचा ATS चा कट! साध्वी प्रज्ञांचा आरोप; NDTV च्या फॅक्ट चेकमधून बाहेर आले सत्य

Malegaon Bomb Blast Verdict: 31 जुलै रोजी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सातही जणांची मुंबईच्या विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने आपल्या अनन्वित छळ केल्याचा आरोप माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा यांना नुकतेच निर्दोष जाहीर करण्यात आले होते. साध्वी प्रज्ञा यांनी आरोप केला होता की या प्रकरणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती करण्यात आली होती आणि त्यासाठी आपला छळही करण्यात आला होता. साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या या दाव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे, याचं कारण ठरलंय 2008 साली त्यांनीच दाखल केलेले प्रतिज्ञापत्र. हे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयाला सादर केले होते आणि त्यात नमूद केलेल्या गोष्टी साधी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या दाव्यापेक्षा वेगळ्या आहेत.  

17 वर्षांत कधीही आरोप नाही ?

31 जुलै रोजी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सातही जणांची मुंबईच्या विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. 2008 साली झालेल्या या बॉम्बस्फोटाच्या साध्वी प्रज्ञा सिंहया  सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 हून अधिकजण जखमी झाले होते. एका मोटार सायकलवर स्फोटके ठेवण्यात आली होती आणि ही मोटार सायकल साध्वी प्रज्ञा यांनी असल्याचे एटीएसचे म्हणणे होते.  न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवशी साध्वी प्रज्ञा यांनी मुंबईतील न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना एक खळबळजनक आरोप केला. एटीएसचे अधिकारी योगी आणि मोदींना अडकवण्यासाठी त्यांना त्रास देत होते, असा त्यांचा आरोप होता.  गेल्या 17 वर्षांमध्ये प्रज्ञा यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा त्यांच्या वकिलांनीही हा आरोप कधीही केला नव्हता. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली.

Advertisement

( नक्की वाचा: PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक दावा )

साध्वींच्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले आहे ?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाल्यानंतर 17 नोव्हेंबर 2008 रोजी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नाशिकच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले होते की, ऑक्टोबर 2008 मध्ये त्या सुरतमध्ये असताना महाराष्ट्र एटीएसने त्यांच्याशी संपर्क साधला. चौकशीच्या नावाखाली त्यांना त्यांचे शिष्य भीमभाई पसरीचा यांच्यासोबत मुंबईला आणले. एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांना मुंबईत चौकशीनंतर सोडून देऊ असे सांगितले होते. मात्र, मुंबईत एटीएसच्या काळाचौकी कार्यालयात आणून त्यांचा छळ केला जाऊ लागला असा आरोप साध्वी प्रज्ञा यांनी केला होता.  मालेगाव बॉम्बस्फोटातील त्यांच्या भूमिकेबद्दल एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारणे सुरू केले आणि अटकेपूर्वीच आपल्याला मारहाण केली जाऊ लागली असा आरोप साध्वी प्रज्ञा यांनी केला होता.   

Advertisement

( नक्की वाचा:साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर भगवा दहशतवादाचा शिक्का बसला आणि खासदारकीचा मार्ग प्रशस्त झाला )

साध्वी प्रज्ञा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आरोप केला होता की एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांचे शिष्य पसरीचा यांना साध्वी प्रज्ञा यांना लाठी आणि पट्ट्याने त्यांना मारण्यास सांगितले. पसरीचा यांनी नकार दिल्यावर एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी पसरीचा यांनी प्रज्ञा यांना मारले. मात्र, पसरीचा हळू मारत असल्याने एटीएस अधिकाऱ्यांनी स्वतःच प्रज्ञा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते. त्यांनी आरोप केला होता की, अधिकाऱ्यांनी त्यांना आणि त्यांच्या गुरुंना शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले. या मारहाणीमुळे त्यांची तब्येत इतकी बिघडली की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रज्ञा यांच्या म्हणण्यानुसार, त्या मानसिकदृष्ट्या इतक्या खचल्या होत्या की त्यांच्या डोक्यात आत्महत्येचा घोळू लागला होता.  

Advertisement

प्रचारामध्येही या मुद्दाचा कधी उल्लेख नाही

आपल्या आठ पानी प्रतिज्ञापत्रात साध्वी प्रज्ञा यांनी एटीएसने केलेली चौकशी आणि वकिलांशी झालेल्या संवादाची माहिती दिली. बेकायदेशीर अटकेची चौकशी करण्याची आणि मारहाण करणाऱ्या एटीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, या संपूर्ण प्रतिज्ञापत्रात त्यांनी कुठेही मोदी किंवा योगी यांचा उल्लेख केलेला दिसला नाही.  गेल्या 17 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी कधीही मोदी किंवा योगींना अडकवण्याचा एटीएसने कट रचल्याचा आरोप केला नव्हता. इतकेच नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही त्यांनी हा आरोप कधीही केला नव्हता.  2019 सालच्या लोकसभा निवडणुकी साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी मध्य प्रदेशातील भोपाळमधून निवडणूक लढवली होती.  

साध्वी प्रज्ञा यांनी असे विधान का केले असावे?

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव स्फोटाचा निकाल आल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी केलेली काही विधाने पक्षातील वरिष्ठ नेत्यांना रुचलेली नाहीत. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे तिकीट बोलघेवडेपणामुळे आणि वादग्रस्त विधानांमुळेच कापल्याचे बोलले जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा मर्जी संपादन करण्यासाठी त्यांनी अशी विधाने केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाशी संबंधित बहुतेक अधिकारी निवृत्त झाले आहेत आणि प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, प्रज्ञा सिंह खोटे बोलत आहेत. या संपूर्ण प्रकरणाशी योगी आणि मोदी यांचा कोणताही संबंध नव्हता.