
रामराजे शिंदे, नवी दिल्ली
पूजा खेडकरला 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता दिल्ली क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 21 मे रोजी पार पडणार आहे. जोपर्यंत चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम राहील. आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सुनावणीत काय झालं?
पूजा खेडकरला चौकशीसाठी का बोलावलं नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यावर आम्हाला कोठडीत चौकशी करायची आहे. सर्वसाधारण चौकशीसाठी बोलवायचे नाही. मात्र खेडकर यांना अटकेपासून संरक्षण आहे, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी केला.
दिल्ली पोलिसांच्या अशारितीन पूजा खेडकरच्या कोठडीची मागणी केली. मात्र कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद पूजा खेडकरच्या वकिलांनी केला आहे. पूजा खेडकर चौकशीला हजर राहतील आणि सहकार्य करतील, असं देखील वकिलांना सांगितलं.
(नक्की वाच- Exclusive : "राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं अशक्य", ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने सांगितले कारण)
15 एप्रिलला झालेल्या सुनावणीत पूजा खेडकर हिला अटक करता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यानंतर न्यायालयाने पूजा खेडकर प्रकरणात आज म्हणजे 21 एप्रिलला सुनावणीची तारीख दिली होती. गेल्या सुनावणीत पूजा खेडकर हिने मोठी फसवणूक केली असून तिच्या कस्टोडियल तपासाची गरज असल्याचा युक्तिवाद यूपीएससीच्या वकिलांनी केला होता. मात्र, पूजा खेडकर यांच्या वकिलाने आम्ही तपासात सहकार्य करायला तयार असल्याचं सांगत कस्टोडियलला विरोध केला आहे.
आतापर्यंत काय घडलं?
15 जानेवारी 2025: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या बेंचने पूजा खेडकरला 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं. दिल्ली सरकार आणि यूपीएससीला नोटीस जारी करून खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उत्तर मागितलं होतं.
14 फेब्रुवारी 2025: सर्वोच्च न्यायालयाने 17 मार्च 2025 पर्यंत पूजा खेडकर हिला अटकेपासून संरक्षण दिलं. तसेच पूजा खेडकर हिला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
(नक्की वाचा- Prajakta Mali : प्राजक्ता माळीने अख्ख्या जगालाच केलं चॅलेन्ज, नॉनव्हेज खाण्यावरून तोडले अकलेचे तारे!)
काय आहे प्रकरण?
पूजा खेडकरवर यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त संधी मिळवल्याचा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2024 ला तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजा खेडकर प्रकरणात प्रथमदर्शी “मोठा कट” असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. यूपीएससीने खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षांसाठी बंदी घातली आहे. मात्र पूजा खेडकर हिने सर्व आरोप फेटाळले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world