
राहुल कुलकर्णी, पुणे
महाराष्ट्र हितासाठी किळकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर लगेचच मी देखील महाराष्ट्रहितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, नाही येतील हा भविष्यातील राजकारणाचा भाग आहेत. मात्र ठाकरे बंधुंच्या या भूमिकेनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. राज्यभर दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. राज आणि उद्ध एकत्र आले तर काय होईल, याचं राजकीय विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार केतकर यांनी केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल. मी एकेकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या खूप जवळचा होतो. त्यामुळे मला हे स्पष्टपणे जाणवतं की जर हे दोघं पुन्हा एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळू शकते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हे शक्य वाटत नाही, असं कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.
राज आणि उद्धव दोन्ही व्यक्तिमत्त्वं स्वतंत्र आहेत. त्यांचा भूतकाळ वेगळा आहे, परंतु दोघांचाही अजेंडा एकच आहे तो म्हणजे ‘मराठी माणसाचं हित.' जर त्यांच्यातील वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवल्या गेल्या, तर ते फक्त एकत्र येणार नाहीत, तर महाराष्ट्रात एक नवं राजकीय समीकरण तयार करतील. त्यांचं एकत्र येणं म्हणजे केवळ शिवसेनेचं पुनरुत्थान नाही, तर ‘मराठी अस्मितेचं नवसंघटन' ठरेल, असंही कुमार केतकर यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Uddhav-Raj Thackeray News : "भांडण बाजूला ठेवायला तयार!", उद्धव ठाकरेंची अटींसह राज यांच्यासोबत यायला तयारी)
एकत्र येण्यातील अडथळे
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकाच घरातून आलेले आहे. एकाच विचारधारेच्या मुळाशी असलेले नेते आहेत. दोघांमध्ये नेतृत्वशैलीत फरक असला, तरी ‘मराठी अस्मिता' हा दोघांचाही मूळ गाभा आहे. त्यामुळे जर हे दोघं एकत्र आले, तर मराठी माणसाचं एक प्रबळ राजकीय व्यासपीठ तयार होऊ शकतं.
पण या दोघांमध्ये वैयक्तिक पातळीवरची सल, आणि भूतकाळातील काही न सुटलेल्या गोष्टी अजूनही जिवंत आहेत. विश्वासाचा अभाव आणि नेतृत्वातला संघर्ष हे देखील मोठे अडथळे आहेत. त्यामुळे हे एकत्र येणं केवळ रणनीतीच्या नव्हे, तर भावनांच्या आणि परिपक्वतेच्या पातळीवरही आव्हानात्मक आहे, असं स्पष्ट मत कुमार केतकर यांनी मांडलं.
(नक्की वाचा- 'आमची जीभ पोळलीय, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा?' संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल)
महाराष्ट्राचं राजकारण आज कमालीचं अस्थिर आहे. सत्ताधारी पक्षांचं आंतरिक ताणतणाव, विरोधकांचं बळकट होत जाणं आणि त्यात मराठी माणसाच्या प्रश्नांवर होणारं दुर्लक्ष या सगळ्याचा फटका सामान्य जनतेला बसतो आहे. यामुळेच राज आणि उद्धव यांचं एकत्र येणं ही केवळ राजकीय चाल नसून मराठी माणसासाठी राजकीय शक्ती एकवटण्याची संधी ठरू शकते, असंही कुमार केतकर यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world