अविनाश पवार
वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईवडिलांनी म्हणजेच मनोरमा आणि दिलीप खेडकरांनी पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढवलाय. हे दाम्पत्य बेपत्ता झालं असून त्यांना शोधून शोधून पोलीस दमलेत. कायदा, सुव्यवस्थेच्या निर्लज्जपणे चिंधड्या उडवणारं हे दाम्पत्य गेले काही दिवस गायब झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांनी 13 सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी एका ट्रक चालकाचे अपहरण केले होते. या ट्रकने खेडकरांच्या गाडीला घासल्याने खेडकर भडकले होते. त्यांनी आपल्या बॉडीगार्डच्या मदतीने या ड्रायव्हरचे अपहण केले आणि आपल्या घरी नेऊन डांबून ठेवले होते.
नक्की वाचा: IAS पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा वादात! मुंबईतून गायब झालेला व्यक्ती पुण्यातील घरात सापडला; VIDEO समोर
मनोरमा खेडकरांची पोलिसांशी अरेरावी
प्रल्हाद कुमार (वय 22) असं अपहरण झालेल्या चालकाचे नाव असून त्याचे अपहरण झाल्याचे कळताच रबाळे पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी निघाले होते. ज्या गाडीतून त्याला नेण्यात आले होते, तिची माहिती मिळाल्याने पोलीस या गाडीच्या मागावर होते. ही गाडी पोलिसांना खेडकरांच्या घरासमोर दिसून आली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी उद्धट आणि उर्मट वर्तन केले होते. यामुळे त्यांना रबाळे पोलीस स्थानकात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
नोटीस फाडली, कुटुंब गायब
या सगळ्या प्रकारानंतर खेडकर दाम्पत्य गायब झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. पोलिसांनाही हा प्रश्न पडलाय की, अखेर हे कुटुंब गेले तरी कुठे? पोलिसांनी या प्रकरणानंतर मनोरमा खेडकर यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस दिली. पण, त्यांनी ती नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे पोलिसांनी ती त्यांच्या घराच्या बाहेर लावून दिली. मात्र दुसऱ्याच दिवशी ही नोटीस फाडलेली आढळली आणि खेडकर कुटुंब घरातून अचानक गायब झाले.
नक्की वाचा: "ती खुनी किंवा दहशतवादी तर नाहीये ना", पूजा खेडकरला जामीन देताना सर्वोच्च न्यायालय पोलिसांवर संतापले
खेडकर कुटुंब आणि वाद ही काही नवीन बाब नाहीये. मुलीच्या वादग्रस्त वर्तनानंतर तिच्यावर निलंबनासह विविध कारवाया करण्यात आल्या. यानंतर तिच्या आईवडिलांचेही कारनामे बाहेर येण्यास सुरूवात झाली. पौड येथील शेतजमिनीच्या वादात मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप आहे. आयपीएस प्रशिक्षणार्थी असताना त्यांच्या मुलीनेही अंबर दिव्याचा गैरवापर केला होता. 5 दिवस झाले तरी पोलिसांना अजून दिलीप आणि मनोरमा खेडकर सापडलेले नाहीयेत. दरवेळी या कुटुंबाने प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेला कस्पटासमान लेखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करून अद्दल घडविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे खेडकर दाम्पत्य हाती लागल्यानंतर पोलीस कशापद्धतीने त्यांना वठणीवर आणतात याची उत्सुकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world