Doctor Death : गुजरातच्या सूरत शहरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका डॉक्टरने उंच इमारतीवरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
कॅफेच्या नवव्या मजल्यावरुन मारली उडी...
मिळालेल्या माहितीनुसार, सूरतचा उच्चभ्रू भाग वेसूमध्ये २८ वर्षीय डॉक्टर राधिका कोटडियाने एका कॅफेच्या नवव्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चा जीव घेतला. कॅफेमधील लोकांना अचानक एका तरुणीला खाली पडताना पाहिलं आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.
डॉ. राधिका एका खासगी रुग्णालयात काम करीत होती. नुकताच तिचा साखरपुडा संपन्न झाला होता. मात्र होणाऱ्या नवऱ्यासोबत कोणत्या तरी मुद्द्यावरुन तिचा वाद झाला होता. यातून तणावात येत तिने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे पोलिसांकडून तिच्या होणाऱ्या पतीची चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राधिकाच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. आता तिच्या मृत्यूनंतर तिच्या तिरडीची तयारी केली जात आहे.
राधिकेने इतकं टोकाचं पाऊल का उचललं या प्रश्नाचा शोध घेतला जात आहे. याशिवाय मानसिक आरोग्य, तणाव आणि नैराश्य हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी राधिकाचा मोबाइल फोन, हँडबॅग आणि दुसरे वैयक्तिक कागदपत्र ताब्यात घेतले आहेत, यातून काही सुगावा लागतोय का याचाही तपास केला जात आहे.
नक्की वाचा - Ratnagiri News : सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तो मेसेज अन् शिक्षकांचे लाखो रुपये गायब
२० ते २५ मिनिटं कॅफेमध्ये बसून राहिली...
मिळालेल्या माहितीनुसार, फिजिओथेरेपिस्ट राधिका साधारण २० ते २५ मिनिटं कॅफेत बसून होती. ती चहा प्यायली. काही वेळाने तिने नवव्या मजल्यावरुन उडी मारून आयुष्य संपवलं. राधिकाच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान व्हॉट्सअॅप मेसेजचं गूढ समोर आलं आहे. राधिकाने आपल्या होणाऱ्या पतीला व्हॉट्सअॅप संदेश पाठवला होता. 'आई-वडिलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या नसतात' यासोबत दोघांमध्ये आणखी बरंच संभाषण झालं. यावरुन लक्षात येतं की राधिका आणि तिच्या होणाऱ्या पतीमध्ये वाद सुरू होता.
हेल्पलाइन
वांद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ ९९९९६६६५५५ किंवा help@vandrevalafoundation.com
TISS iCall : ०२२-२५५२११११ (सोमवार ते शनिवार - सकाळी ८:०० ते रात्री १०:०० पर्यंत उपलब्ध)
(जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा मदतीची गरज असलेल्या एखाद्या व्यक्तीला माहिती असेल तर कृपया तुमच्या जवळच्या मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी संपर्क साधा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
