
तामिळनाडूमधील कोइम्बतूर जिल्ह्यातील एका खासगी शाळेतून संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिची मासिक पाळी सुरू असल्याने वर्गाच्या बाहेर काढण्यात आलं आणि बाहेर बसून परीक्षा लिहिण्यास सांगण्यात आलं. ही घटना पोलाचीजवळील सेनगुट्टुईपलायममधील एका शाळेत घडली आहे.
विद्यार्थिनीच्या आईनेच हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, विद्यार्थिनी वर्गाच्या बाहेर जमिनीवर बसून पेपर लिहित आहे. ही विद्यार्थिनी दलित कुटुंबातील असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीची या आठवड्यात दोन परीक्षा होत्या. तिच्या आई-वडिलांनी परीक्षेदरम्यान तिची मासिक पाळीची स्थिती लक्षात घेता वेगळ्या डेस्कची मागणी केली होती. मात्र तरीही सोमवारी विद्यार्थिनीला वर्गाच्या बाहेर जमिनीवर बसवण्यात आलं. बुधवारी जेव्हा विद्यार्थिनी दुसऱ्या परीक्षेसाठी शाळेत गेली, तेव्हाही मुलीला बाहेरच बसवून परीक्षा द्यावी लागली त्यावेळी विद्यार्थिनीच्या आईने हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला.
शाळा व्यवस्थापनाकडून मागितलं स्पष्टीकरण...
पीडित विद्यार्थिनीच्या आईने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी म्हणते, शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला इथं बसण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मुख्य शिक्षण अधिकारी या घटनेचा तपास करीत आहेत. शाळेच्या व्यवस्थापकांकडून यासंदर्भातील स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे.
विद्यार्थिनीला मासिक पाळी सुरू असल्याने विद्यार्थिनीच्या आईने मुख्याध्यापकांची भेट घेत तिला वेगळी आसन व्यवस्था देण्याची विनंती केली होती. मात्र आई निघून गेल्यानंतर तिला वर्गाबाहेर जमिनीवर बसवण्यात आलं. त्यामुळे मुलीचे पाय दुखू लागले होत. त्यामुळे ती त्रस्त झाली होती. दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली नाही. बुधवारी शाळेत गेली तेव्हा तिला पुन्हा वर्गाबाहेर बसवण्यात आलं. यावर आईने व्हिडिओ शूट करीत संताप व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world