Trending News : पत्नीवरील अपार प्रेम आणि तिला वाचवण्याची तीव्र इच्छा, या एकाच ध्येयाने झपाटलेल्या एका सामान्य माणसाची ही कहाणी आहे. छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातील समलू मरकाम यांनी त्यांच्या 57 वर्षांच्या पत्नीला कॅन्सरच्या उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या बाईकलाच तात्पुरती ॲम्ब्युलन्स बनवले आहे. पत्नीला वाचवण्यासाठी त्यांनी आपले घर आणि शेतजमीन देखील विकली आहे, पण त्यांची आर्थिक लढाई अजून संपलेली नाही.
समलू मरकाम यांच्या पत्नी, कपुरा मरकाम, गेल्या सुमारे 3 वर्षांपासून थायरॉईड कॅन्सरशी झुंज देत आहेत. उपचारांवर आतापर्यंत सुमारे 5 लाख रुपये खर्च झाले आहेत आणि त्यांचे सर्व आर्थिक स्रोत संपुष्टात आले आहेत. या आजारामुळे त्यांची पत्नी आता चालू शकत नाही किंवा उभीही राहू शकत नाही, त्यांचे दोन्ही पाय सुन्न झाले आहेत. तरीही, लग्नाच्या वेळी दिलेले वचन समलू आजही प्रामाणिकपणे निभावत आहेत आणि आशा सोडलेली नाही.
बाईकच बनली उपचारांसाठी आधार
पैसे नसल्यामुळे, समलू मरकाम यांनी आपल्या पत्नीला एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी आपल्या मोटरसायकलच्या मागील सीटवर एक फळी लावून त्यावर गादी अंथरली आहे आणि पत्नीला तिथे झोपवतात. त्यानंतर, प्रवासात ती खाली पडू नये म्हणून ते त्यांना दोरीने बांधतात. या 'बाईक-ॲम्ब्युलन्स'मधून ते गेल्या 2 वर्षांपासून उपचारांसाठी दरोदार भटकत आहेत.
उपचारांसाठी सर्वस्व पणाला
एका मुलाखतीत समलू मरकाम यांनी आपली हृदयद्रावक कहाणी सांगितली. 3 वर्षांपूर्वी पत्नीला थायरॉईड कॅन्सरचे निदान झाले. तेव्हापासून त्यांनी छत्तीसगडमधील अनेक मोठे हॉस्पिटल, तसेच इतर राज्यांमध्येही उपचार केले, अगदी आयुर्वेदिक औषधींचाही वापर केला. या उपचारांसाठी त्यांना आपले घर आणि शेतजमीन विकावी लागली आणि जवळजवळ 5 लाख रुपये खर्च झाले.
( नक्की वाचा : Shocking News : प्रेम, फसवणूक आणि सत्ता: महिला DSPने जाळ्यात ओढून व्यावसायिकाकडून कोट्यावधी हडपले! )
मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. समलू आज पूर्णपणे आर्थिक संकटात आहेत. ते म्हणतात, 'आता मी थकून गेलो आहे. पत्नीचा त्रास पाहवत नाही. देवाने एकतर तिला मृत्यू द्यावा किंवा सरकारने मदत करावी, जेणेकरून मी तिला बरे करू शकेन.'

एम्समध्ये सुरू आहेत उपचार
समलू यांच्या पत्नीवर सध्या रायपूर एम्स (AIIMS) मध्ये उपचार सुरू आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये 1 आठवड्यापासून दाखल आहेत. परंतु, दुर्दैवाने समलू यांच्याकडे पत्नीच्या रक्त तपासणी आणि मूत्र तपासणीसारख्या नियमित तपासण्यांची फी भरण्यासाठीही पैसे नाहीत. ते रायपूर सदनमध्ये राहून लोकांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्यांच्या पत्नीचे उपचार सुरू राहू शकतील. त्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदतीची अपेक्षा आहे, जेणेकरून त्यांच्या पत्नी पुन्हा आपल्या पायावर उभ्या राहू शकतील.
समलू मरकाम यांच्या समस्येबाबत कवर्धा येथील जिल्हा चिकित्सा आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉक्टर देवेंद्र कुमार तुर्रे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले की, अशा गरजू रुग्णांसाठी आयुष्मान कार्ड अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची तरतूद आहे.

रुग्णाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दिलासा मिळत नसेल, तर या योजनेंतर्गत 'बालको कॅन्सर केअर हॉस्पिटल' हा सर्वोत्तम पर्याय असेल. अनेक रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी पाठवले गेले आहे आणि त्यांना दिलासाही मिळाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ऑपरेशन झाल्यावर रुग्ण दर महिन्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये येऊन मोफत किमोथेरपी घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे बरे होण्याची शक्यता वाढेल. त्यांनी समलू यांना शासकीय मदतीसाठी अर्ज करण्याचा सल्लाही दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world