उदयपूर – भारत-पाकिस्तानमधील तणाव आणि तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या उघड पाठिंब्याच्या निषेधार्थ उदयपूर मार्बल प्रोसेसर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. समितीने एकमताने तुर्कीसोबतचे सर्व व्यापारिक संबंध तोडण्याची आणि तुर्कीहून होणाऱ्या आयातींवर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उदयपूर मार्बल प्रोसेसर समितीचे अध्यक्ष कपिल सुराणा यांनी सांगितले की, तुर्कीसोबत अनेक वर्षांपासून चांगले व्यापारिक संबंध होते. भारत दरवर्षी सुमारे 14 लाख टन मार्बल तुर्कीहून आयात करतो, यातील सुमारे 70 टक्के फक्त तुर्कीहून येते. याचे वार्षिक मूल्य सुमारे 5000 कोटी रुपये आहे. मात्र, आता तुर्कीच्या पाकिस्तानसमर्थक धोरणाच्या विरोधात हा व्यवहार पूर्णतः बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुण्यातील फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन; काय आहे प्रकरण?)
व्यापाऱ्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेला आणि सन्मानाला आम्ही प्राधान्य देतो. उदयपूर मार्बल असोसिएशनचे अध्यक्ष पंकज गंगावत यांनी सांगितले, “भारत आमच्यासाठी आधी आहे, व्यापार नंतर येतो. तुर्की जर पाकिस्तानच्या बाजूने उभा राहतो, तर आमच्यासाठी तो शत्रू समान आहे. आता आम्ही त्यांच्याकडून एक इंचही माल मागवणार नाही.”
समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून संपूर्ण भारतात तुर्कीहून होणाऱ्या मार्बल आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच, तुर्कीशी असलेल्या पर्यटन, आयात-निर्यात व अन्य द्विपक्षीय व्यापार करारांचा पुन्हा आढावा घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
(नक्की वाचा - Nagpur News : डास तपासणीसाठी पदवीधर-पदव्युत्तर उमेदवारांचे अर्ज, बेरोजगारीचं भीषण वास्तव)
समितीचे महासचिव डॉ. हितेश पटेल यांनी सांगितले की, उदयपूरमधील 50 हून अधिक मोठ्या मार्बल कंपन्यांनी तुर्कीहून आयात थांबवण्याची घोषणा केली आहे. जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत राहील, तोपर्यंत एकही टन मार्बल भारतात आणला जाणार नाही, असा स्पष्ट निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मेवाडचा उदयपूर ही आशियातील सर्वात मोठी मार्बल मंडी मानली जाते. दरवर्षी तुर्कीहून हजारो टन मार्बल येथे पोहोचतो. मात्र, देशभक्तीच्या भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे उदयपूरने एक प्रेरणादायी उदाहरण देशासमोर ठेवले आहे.