जाहिरात

असह्य वेदना सहन करणाऱ्या 3 वर्षांच्या मुलीचा 'संथारा', काही मिनिटांत मृत्यू; जागतिक विक्रमाची नोंद

संथारा ही जैन धर्मातील एक प्रथा आहे. संथारा धारण करणारी व्यक्ती मृत्यू येईपर्यंत उपास करते. ती व्यक्ती अन्न-पाण्यासह इतर ऐहीक गोष्टींचा त्याग करते.

असह्य वेदना सहन करणाऱ्या 3 वर्षांच्या मुलीचा 'संथारा', काही मिनिटांत मृत्यू; जागतिक विक्रमाची नोंद

ब्रेन ट्युमरशी झुंजत असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलीने जागतिक विक्रम केला आहे. या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिला मृत्यूपूर्वी संथारा व्रत देण्यात आले होते. या चिमुरडीचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्याची माहिती देण्यात आली असून तसे प्रमाणपत्रही जारी करण्यात आले आहे. 'संथारा' ही जैन धर्मातील प्रथा असून हीच प्रथा वापरून विआना या तीन वर्षांच्या मुलीने आपला प्राण त्याग केला . 

संथारा म्हणजे काय?

संथारा ही जैन धर्मातील एक प्रथा आहे. संथारा धारण करणारी व्यक्ती मृत्यू येईपर्यंत उपास करते. ती व्यक्ती अन्न-पाण्यासह इतर ऐहीक गोष्टींचा त्याग करते. 2015 साली राजस्थान उच्च न्यायालयाने ही प्रथा बेकायदेशीर असल्याचे आपल्या आदेशात म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. ज्यामुळे  ही प्रथा कायदेशीर आहे.

अवघ्या तीन वर्षांच्या विआनाने 'संथारा' का घेतला?

सदर घटना ही मध्य प्रदेशातील इंदूरमधली असून या चिमुरडीचे नाव विआना आहे. तिचे आई-वडील हे दोघेही आयटी क्षेत्रात काम करतात. त्यांनी सांगितले की एका जैन मुनींच्या प्रेरणेमुळे त्यांनी आपल्या मुलीला संथारा व्रत देण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी संथारा व्रत घेणाऱ्या विआनाचे वडील पीयूष जैन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, " माझ्या मुलीला जानेवारी महिन्यात ब्रेन ट्युमर झाल्याचे आम्हाला कळाले होते. त्यानंतर आम्ही तिच्यावर शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मार्च महिन्यात तिची प्रकृती पुन्हा खालावली, ज्यानंतर तिला खाण्या-पिण्यात अडचण येऊ लागली होती. "

पीयूष जैन यांनी सांगितले की 21 मार्च रोजी विआनाची प्रकृती जास्तच खालावली होती. ज्यामुळे ते आपल्याला मुलीला घेऊन जैन संत राजेश मुनी यांच्याकडे गेले होते. राजेश मुनी यांनी विआनाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की या मुलीचा अंत जवळ आला आहे आणि तिला संथारा व्रत देण्यात यावे. जैन धर्मात या व्रताचे फार महत्त्व आहे असे सांगितले जाते. पीयूष जैन यांनी म्हटले की बराच विचार केल्यानंतर आम्ही जैन मुनींनी सांगितलेला उपदेश मानण्याचा निर्णय घेतला.  जैन संतांद्वारे संथाराचा विधी पूर्ण करण्यात आला. हा विधी झाल्याच्या काही मिनिटांतच विआनाने प्राण सोडले. 

विआनाचा मत्यू झाला मात्र तिच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद झाल्याचे पीयूष जैन यांनी सांगितले. जैन धर्मातील विधींचा अवलंब करून संथारा व्रत घेणारी जगातील सगळ्यात कमी वयाची व्यक्ती बनल्याबद्दल विआनाचे नाव गोल्डन बुक ऑफ अवॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. विआना ही जैन दाम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. आपल्याला मुलीला संथारा व्रत देण्याचा निर्णय हा माझ्यासाठी किती कठीण होता हे मी सांगूही शकत नाही असे तिच्या आईने म्हटले आहे. ब्रेन ट्युमरमुळे माझ्या मुलीने असह्य वेदना सहन केल्या, बराच त्रास झेलला. तिची ही अवस्था मला पाहावत नव्हती असे विआनाच्या आईने म्हटलंय. विआनाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या तिच्या आईने म्हटले की,'पुढच्या जन्मात माझी मुलगी सदैव आनंदी राहावी.'

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: