- मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील शासकीय विद्यालयाच्या आवारात बार डान्सर्सच्या अश्लील नृत्याचा कार्यक्रम
- या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्रांगणात मोठा मंच उभारण्यात आला आणि शाळा प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती
- अशा प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून शाळेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे
Bar Dancers Party: ज्या शाळेत मुलांच्या भविष्याला आकार दिला जातो, तिथेच रात्रभर अश्लील नृत्याचा धिंगाणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत विद्या शिकवली जाते. ते एक विद्येचे पवित्र मंदिर समजले जाते. याच शाळेत विद्यार्थी घडवले जातात. त्यांच्यावर संस्कार केले जातात. अशाच शाळेच्या मंदिरात डान्सबार गर्ल नाचवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बारगर्ल शाळेच्या आवारात रात्रभर अश्लील नृत्य करत होत्या. पण त्यांना अडवणार कोणी नव्हतं. या नृत्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियीवर व्हायरल होत आहे. शिवाय संताप ही व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सरकारी शाळेत घडला आहे.
मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातून शिक्षणाच्या क्षेत्राला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. परासरी येथील एका शासकीय माध्यमिक विद्यालयाच्या आवारात गुरुवारी रात्री चक्क बार डान्सर्सच्या डान्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या अश्लील नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शाळा व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शिवाय अशा पार्टीसाठी शाळा कुणी उपलब्ध करून दिली. त्याला परवानगी देणारे कोण अशी विचारणा होत आहे.
नक्की वाचा - 'हिजाबवर जर कोणी हात टाकला तर हात कापून टाकेन' जलील यांची धमकी कुणाला? वाद पेटणार?
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्रांगणातच मोठा मंच उभारण्यात आला होता. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चित्रपट गीतांच्या तालावर बार डान्सर्सचा डान्स सुरू होता. विशेष म्हणजे, या आयोजनाला शाळा प्रशासनानेच परवानगी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यापूर्वी बुधवारी रात्री याच शाळेत लोकगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र त्यानंतर गुरुवारी थेट ऑर्केस्ट्रा पार्टी भरवण्यात आली.
या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कार देणे असताना, अशा अश्लील प्रकारांमुळे शाळेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची कल्पना असतानाही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हा प्रशासन आता या दोषींवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.