- बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवलिया येथे जगातील सर्वात मोठे विराट रामायण मंदिर उभारले जाणार आहे
- महाबलीपुरम येथील काळ्या ग्रॅनाइट पाषाणातून तयार केलेले 33 फूट उंच आणि 210 मेट्रिक टन वजनाचे शिवलिंग आहे
- या प्रचंड शिवलिंगाची वाहतूक करण्यासाठी 96 चाके असलेल्या विशेष ट्रकचा वापर केला आहे
बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवलिया येथे 'विराट रामायण मंदिर साकारले जाणार आहे. यासाठी जगातील सर्वात मोठे शिवलिंग शनिवारी बिहारच्या सीमेवर पोहोचले आहे. तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथून हे शिवलिंग रस्तेमार्गे आणले जात आहे. हे महाकाय शिवलिंग पाहण्यासाठी गोपालगंज येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल 10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे शिवलिंग पूर्ण झाले आहे. ते भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जात आहे. तामिळनाडूच्या महाबलीपुरम इथं हे तयार करण्यात आले आहे.
हे शिवलिंग 33 फूट उंच असून ते एकाच अखंड काळ्या ग्रॅनाइट (Black Granite) पाषाणातून कोरण्यात आले आहे. याचे एकूण वजन 210 मेट्रिक टन इतके प्रचंड आहे. या महाकाय शिवलिंगाची वाहतूक करण्यासाठी 96 चाके असलेल्या विशेष ट्रकचा वापर करण्यात येत आहे. सुमारे 3 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या शिवलिंगावर दक्षिण भारतीय कोरीव कामाची छाप स्पष्टपणे दिसून येते. कैथवलिया इथं उभारण्यात येणाऱ्या मंदिरात हे स्थापन केले जाणार आहे. हे जगातले सर्वात मोठे शिवलिंग असल्याचा दावा केला जात आहे.
नक्की वाचा - 'हिजाबवर जर कोणी हात टाकला तर हात कापून टाकेन' जलील यांची धमकी कुणाला? वाद पेटणार?
या भव्य मंदिराची पायाभरणी 20 जून 2023 रोजी करण्यात आली होती. सध्या शिवलिंग उत्तर प्रदेशच्या सीमेवरून बिहारमधील गोपालगंज येथे पोहोचले आहे. पुढील 50 ते 60 तासांत ते आपल्या नियोजित स्थळी म्हणजेच मोतिहारी येथे पोहोचण्याची शक्यता आहे. बिहारच्या सीमेत प्रवेश करताच, गोपालगंज जिल्हा प्रशासनाचे अनेक उच्चाधिकारी आणि पोलीस जवान या शिवलिंगाच्या सुरक्षेसाठी तैनात झाले. अनेक भाविक या विशाल शिवलिंगाची फुले आणि चंदनाने पूजा करताना दिसले.
हे भव्य शिवलिंग महाबलीपुरममधील पट्टिकाडू गावात तयार करण्यात आले आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हे शिवलिंग एकाच अखंड ग्रॅनाइट पाषाणातून घडवण्यात आले आहे, जे भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याच्या बांधकामावर दक्षिण भारतीय नक्काशी शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. गोपालगंज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे शिवलिंग गंतव्य स्थानी पोहोचवण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगली जात आहे, त्यामुळे गोपालगंजची सीमा ओलांडण्यासाठीच याला अजून पुढील 50 ते 60 तास लागू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world