
Cough Syrup: भारतातील भेसळयुक्त कफ सिरपच्या सेवनामुळे 22 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोठी कारवाई केली आहे. डब्ल्यूएचओने तीन भारतीय फार्मा कंपन्यांच्या कफ सिरपबाबत इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे ज्या 'कोल्ड्रिफ' सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला होता, त्याचाही या सिरपच्या यादीत समावेश आहे. डब्ल्यूएचओने जगातील सर्व आरोग्य प्राधिकरणांना आवाहन केले आहे की, हे सिरप कुठेही आढळल्यास तातडीने आरोग्य एजन्सींना कळवावे.
या तीन कफ सिरपमध्ये आढळली भेसळ
जागतिक आरोग्य एजन्सीने तपासणीनंतर ज्या तीन फार्मा कंपन्यांच्या विशिष्ट बॅचच्या सिरपमध्ये भेसळ आढळली आहे, त्यांची नावे आणि कंपन्यांची माहिती जारी केली आहे.
- कोल्ड्रिफ (Coldrif)- (श्रीसन फार्, तामिळनाडू)
- रेस्पिफ्रेश टीआर (RespifreshTR) - (रेडनेक्स फार्मास्यूटिकल्स, गुजरात)
- रिलाइफ (ReLife) - (शेप फार्मा, गुजरात)
(नक्की वाचा- Bira 91 : फक्त एक शब्द काढला आणि बिअर ब्रँड अडचणीत; 748 कोटींचं नुकसान... वाचा काय घडलं?)
या सिरपच्या तपासणीत डायथिलीन ग्लायकोल नावाचे विषारी रसायन मोठ्या प्रमाणात आढळले आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे की हे सिरप आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात आणि अनेक जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. डायथिलीन ग्लायकोल हे रसायन आहे सिरपला गोडवा आणण्यासाठी वापरले जाते. मात्र, हे रसायन मानवी सेवनासाठी पूर्णपणे अयोग्य आणि विषारी असते.
भारतात आधीच उत्पादन थांबवण्याचे आदेश
डब्ल्यूएचओने जागतिक इशारा देण्यापूर्वीच, भारतात या तीनही सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) डब्ल्यूएचओला माहिती दिली आहे की, या तिन्ही सिरपच्या बॅचेस मेडिकल स्टोअर्समधून त्वरित परत मागवल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या उत्पादकांना उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world