
Angaraki Sankashti Chaturthi 2025 Date And Time: "वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥"
हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थी हे एक महत्त्वाचे व्रत मानले जाते. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. हीच चतुर्थी मंगळवारी आल्यास त्यास 'अंगारक संकष्ट चतुर्थी' म्हणतात. मान्यतेनुसार अंगारक म्हणजे मंगळ. यंदा अंगारकी संकष्ट चतुर्थी कधी आहे, तिथी काय आहे?, चंद्रोदयाची वेळ, व्रत केल्यास कोणते लाभ मिळतील, अंगारक संकष्ट चतुर्थीची पौराणिक कथा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊया...
श्रावण महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी (Angaraki Sankashti Chaturthi 2025 Time)
मंगळवार 12 ऑगस्ट 2025 सकाळी 8.40 वाजता अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी सुरू होईल.
बुधवार 13 ऑगस्ट 2025 सकाळी 6.36 वाजता अंगारक संकष्ट चतुर्थी तिथी समाप्त होईल.
चंद्रोदयाची वेळ :मुंबई, ठाणे शहर | Chandrodaya Time
रात्री 9. 17 वाजता
श्री गणेश पूजनाचे साहित्य | Shri Ganesh Pujan Sahitya
श्रीफळ, हळद, कुंकू, गुलाल, दुर्वा, जास्वंदाची फुले, शेंदूर, चंदन, रक्तचंदन, कापूर, अष्टगंध, अक्षता, उदबत्ती, धूप, समई, निरांजने, फुले, फळे, नैवेद्य इत्यादी आवश्यक गोष्टींचा समावेश करावा.
पंचामृत
पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर. या पाच पदार्थांपासून तयार केलेले पंचामृत आरोग्यासाठी देखील पोषक मानले जाते.
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पूजन कसे करावे? | Ganesh Puja Rituals
- पहाटे उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- दिवसभर उपवास करावा. संकल्प देखील करावा.
- धातूच्या श्रीगणेशाच्या मूर्तीचा अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा.
- अभिषेक करताना गणपती मंत्राचा 108 वेळा जप करावा.
- श्रीगणपतीस्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा संकष्टनाशन स्तोत्र पठण करणे.
- चंद्रोदयाच्या वेळेनुसार धूप, दीप, फुलेफळं अर्पण करुन पूजा करावी.
- बाप्पाला नैवेद्य अर्पण करावा.
- चंद्राचे दर्शन घेऊन अर्घ्य देऊन त्याचे दर्शन घेऊन उपवास सोडावा.
अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास कोणते लाभ मिळतील? | Angaraki Sankashti Chaturthi 2025 Vrat Benefits
मान्यतेनुसार असे म्हणतात की,
- श्री गणेशाची कृपादृष्टी होईल.
- जीवनातील संकटं, अडथळे आणि ग्रहदोष दूर होण्यास मदत मिळेल.
- आरोग्य आणि समृद्धीचा लाभ होईल.
अंगारक संकष्ट चतुर्थीची पौराणिक कथा (Angarak Sankasht Chaturthi Katha)
अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते. त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. ते श्री गणेशाचे मोठे भक्त होते. आश्रमात येणाऱ्या मुलांना ते श्री गणेशाची आराधना शिकवत असत. त्यांना मूलबाळ नव्हते. एकेदिवशी भारद्वाज मुनी नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करत बसले. त्यावेळेस नारदांची स्वारी तेथे आली. नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले, "हे पाहा, गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झाले आहेत. तुमच्यासमोर जे तान्हे बाळ आहे, तो श्री गणेश यांनीच तुम्हाला प्रसाद म्हणून दिलंय". भारद्वाजमुनींना आश्चर्य वाटले. मुनींनी बाळाला मांडीवर घेतले. ते अतिशय लाल लाल जणू अंगारच वाटत होते. मुनींनी बाळाचे नाव अंगारक पुत्र असे ठेवले.
भक्ती पाहून गणपती बाप्पा प्रसन्न झाले
मुनींनी बाळाला आपल्या आश्रमात आणले. त्याचे पालनपोषण केले. बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकविली. तो देखील गणेशाची आराधना करू लागला. एकेदिवशी तो आश्रमातून निघून गेला. त्याने नर्मदेची परिक्रमा केली. तेथील एका निवांत जागी त्याने श्री गणेशाची कठोर आराधना केली. संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपती बाप्पाच्या ध्यानामध्ये मग्न झाला. त्याची कठोर साधना फळास आली. गणपती बाप्पा प्रगट झाले. ते म्हणाले, "वत्सा,तुला काय हवंय ते माग."
अंगारक पुत्राने गणपती बाप्पाकडे कोणते वर मागितले?
"मला धन, मान काहीच नको. तुमच्या रूपामध्ये मला विलीन करा. मुक्त करा." बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले, "तथास्तु ! अंगारका, तू भूमिपुत्र मंगळ आहेस. आज मंगळवार आहे. संकष्टी चतुर्थी देखील आहे. ही माझी आवडती तिथी आहे. आज तू माझ्यामध्ये एकरुपता प्राप्त केली आहेस. आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला 'अंगारक चतुर्थी' हे नाव दिले जाईल. अशा या अंगारक चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य लाभते." तेव्हापासून अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठेने साजरे होऊ लागले.
गणपती बाप्पाचे श्लोक | Ganpati Bappa Shlok
1. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा
अज्ञानत्व हरोनि बुद्धि मज दे, आराध्य मोरेश्वरा
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा, गणनायका गजमुखा, भक्तां बहु तोषवी
2. मोरया मोरया, मी बाळ तान्हे
सेवा तुझी ती करू काय जाणे?
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
3.नेत्री दोन हिरो प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर पाझरे, वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे
माझे चित्त नुरे, मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे
गोसावी सुत वासुदेव कवि रे, या मोरयाला स्मरे
महागणपतिस्त्रोत्र:
श्री गणेशाय नमः ।
नारद उवाच ।
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यमायुः कामार्थसिद्धये ।। प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्र धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ।।
इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् ॥
श्री गणेशाची आरती
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची|
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥1॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पूर्ती॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी कुंकुमकेशरा|
हिरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥2॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पूर्ती॥धृ॥
लंबोदर पितांबर फणिवरबंधना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा वाट पाहे सदना|
संकटीं पावावें निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पूर्ती॥धृ॥
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world