जाहिरात

Urine Problem Ayurvedic Remedy: लघवीला फेस येतोय? या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

Urine Symptoms: तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही लघवी करत असताना ती फेसाळ असेल किंवा बुडबुडे येत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नये. ही गोष्ट आरोग्याच्या गंभीर समस्यांकडे अंगुलनिर्देश करणारी आहे.

Urine Problem Ayurvedic Remedy: लघवीला फेस येतोय? या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात
मुंबई:

Foamy Urine: शरीरातील वाईट हे एकतर घामावाटे बाहेर फेकले जातात किंवा लघवीवाटे.  शरीर शुद्ध राहावे यासाठीची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यापैकी लघवी ही तुमच्या शरीरामध्ये काय सुरू आहे याचे स्पष्ट संकेत देत असते. यामुळेच तुम्ही आजारी पडलात तर रक्तासोबतच लघवीचीही तपासणी केली जाते. अनेकजण लघवीला फेस येत असल्याची तक्रार करतात. मात्र हे कशामुळे होतं हे माहिती नसतं. प्रसिद्ध आयुर्वेदीक आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की जर लघवीतून फेस पडत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. 

(नक्की वाचा: झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह 2 लवंग चावून खा, हे गंभीर आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाहीत )

लघवीतून फेस का पडतो ?

श्वेता शाह यांनी म्हटलंय की, कधीकधी लघवीतून फेस पडणे हे स्वाभाविक आहे, मात्र याचे प्रमाण वाढले तर ती बाब चिंताजनक असते. यामागे काही कारणे आहेत ती जाणून घेऊयात.

प्रोटीन लीक

श्वेता शाह यांनी म्हटले की किडनी नीट काम करत नसेल तर प्रोटीनही लघवीवाटे बाहेर पडते ज्यामुळे हा फेस दिसू शकतो. 

शरीरात पाण्याची कमतरता

पाणी कमी प्यायले जात असेल तर लघवी घट्ट होते आणि त्यामुळेही ती फेसाळ होते. 

संसर्गाची बाधा

मूत्राशयाला संसर्गाची बाधा झाली असेल तरीही लघवीवाटे फेस येऊ शकतो. 

( नक्की वाचा: भूक लागल्यानंतर राग आणि चिडचिड का होते? जाणून घ्या सविस्तर )

मग करायचं काय ?

ही बाब चिंताजनक असून त्यावर वेळीच इलाज करणे गरजेचे असते. जर लघवीवाटे फेस पडत असेल तर किडीनीचे कार्य नीट होत नाहीये असा ढोबळ मानाने अर्थ काढला जाऊ शकतो. किडनीचे कार्य अधिक प्रभावीपणे व्हावे आणि शरीरातील टॉक्सिन बाहेर फेकण्याचे कार्य सुधारावे यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करू शकतो. 

ऑईल पुलिंग (Oil Pulling)

श्वेता शाह यांनी या समस्येवर मात करण्यासाठी पहिला उपाय सांगितला तो म्हणजे ऑईल पुलिंगचा. यामध्ये एक चमचा तिळाचे तेल घेऊन खळखळून चूळ भरावी. असं केल्याने तोंड आतून साफ होतं आणि डीटॉक्सिकेशनलाही मदत होते. 

पाण्याची मात्र वाढवणे (Hydration)

दिवसभरातून किमान 8-10 ग्लास कोमट किंवा साधं पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी पाणी पीत असताना पाण्यात थोडंसं काळं मीठ किंवा एक-दोन थेंब लिंबाचा रस मिसळून ते प्यावे. यामुळे शरीरातील pH संतुलन राखण्यास मदत होते आणि किडनीचे कार्य सुधारण्यास मदत होते. 

धण्याचे पाणी (Coriander Water)

किडनीचे कार्य सुधारण्यासाठी आणि खासकरून मूत्राशयाचा संसर्ग दूर करण्यासाठी धण्याचे पाणी पिणे हे फायदेशीर ठरते. यासाठी एक चमता धणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत आहे सकाळी ते पाणी गाळून उपाशीपोटी प्यावे. 

नारळ पाणी (Coconut Water)

नारळाचे पाणी प्यायल्याने लघवी अधिक होते. नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखण्यास मदत होते. दररोज नारळ पाणी पिणे हे त्यामुळे फायदेशीर ठरते. 

जवाचे पाणी (Berley Water)  

जवाचे पाणी किंवा बार्ली वॉटर प्यायल्यानेही किडनीचे कार्य सुधारणा होण्यास मदत होते. लघवीशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी याचा बराच फायदा होतो. एक चमचा जव, 2 कप पाण्यामध्ये मिसळून ते पाणी उकळून घ्यावे. हे पाणी गाळून दिवसातून 1-2 वेळा प्यावे. 

त्रिफळा चूर्ण (Triphala Churna)

रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे. आयुर्वेदीक आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी म्हटले की असे केल्याने पचन क्षमता सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जाण्यास मदत होते. 

श्वेता शाह यांनी सांगितले की लघवीतून फेस पडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. किडनीचे कार्य सुधारावे आणि भविष्यात होणारा त्रास टाळण्यासाठी हे सोपे उपाय करून पाहायला हरक नाही. मात्र असे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com