- भारतीय आहारात तांदूळ हा मुख्य घटक असून पूर्वी किमान अर्धा तास भिजवून शिजवण्याचा सल्ला दिला जात असे
- तांदळात असलेला फायटिक ॲसिड शरीराला आवश्यक खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करतो, त्यामुळे भिजवणे आवश्यक आहे
- भिजवलेल्या तांदळामुळे पोषक तत्वांचे शोषण सुधारते आणि पचनक्रिया सुलभ होते.
भारतीय आहारात तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोशापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तांदूळ हा मुख्य घटक असतो. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात अनेकजण तांदूळ न भिजवता थेट शिजवतात. आपल्या पूर्वजांच्या काळात तांदूळ किमान अर्धा तास भिजत घातले जायचे. ही केवळ सवय नसून त्यामागे मोठे आरोग्यदायी कारण दडलेले आहे. तांदूळ न भिजवता खाल्ल्यास त्याचे फायदे मिळण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते. तेच आपण आज पाहाणार आहोत. त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे वैज्ञानिक कारण?
तांदळामध्ये 'फायटिक ॲसिड' नावाचा घटक असतो. हे ॲसिड शरीराला लोह (Iron), कॅल्शियम आणि झिंक यांसारखी आवश्यक खनिजे शोषून घेण्यापासून रोखते. जेव्हा आपण तांदूळ पाण्यात भिजवतो, तेव्हा या ॲसिडची पातळी कमी होते. यामुळे शरीर अन्नातील पोषक तत्वे सहज शोषून घेऊ शकते. विशेषतः मुले, महिला आणि वृद्धांसाठी ही पद्धत हाडे मजबूत करण्यासाठी आणि ॲनिमियासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तांदूळ हा पाण्यात भिजवल्यानंतर शिजवणे अधिक योग्य ठरते.
पचन आणि चवीसाठी उत्तम
भिजवलेले तांदूळ लवकर शिजतात आणि ते मऊ होतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटात जडपणा जाणवत नाही. उन्हाळ्यात तांदूळ दोन तासांपेक्षा जास्त वेळ भिजवू नयेत, कारण त्यातील पोषक तत्वे पाण्यात विरघळू शकतात. तांदूळ भिजवलेले पाणी फेकून देऊन ताज्या पाण्यात ते शिजवणे केव्हाही उत्तम. काही जण भिजवलेल्या तांदळाचे पाणीच पुन्हा शिजवण्यासाठी वापरतात. किंवा काही जण तर पाण्यात न भिजवताच तांदूळ शिजत घालतात. ही पद्धत ही योग्य समजली जात नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.
तांदूळ भिजत घाला आणि निरोगी राहा!
अनेक गृहिणी वेळ वाचवण्यासाठी तांदूळ फक्त धुतात आणि लगेच कुकरला लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की ही पद्धत तुमच्या आरोग्यासाठी चुकीची ठरू शकते? आपल्या आजी-पणजी नेहमी तांदूळ आधी भिजत घालत असत, कारण त्यामुळे भात सुटसुटीत आणि पचायला सोपा होतो. तांदूळ भिजवल्याने त्यातील विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीराला पूर्ण पोषण मिळते. त्यामुळे आता जेवण बनवताना थोडा वेळ आधी तांदूळ भिजत घाला आणि निरोगी राहा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world