
Better Sleep Tips: सात ते आठ तास झोपणे शरीरासाठी आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यास ताजेतवाने वाटते आणि शरीरातील ऊर्जा देखील टिकून राहते. लघवी होणे, तहान लागणे, वाईट स्वप्न पडणे किंवा झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही रात्रीच्या झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतात. कधीकधी रात्री अचानक झोप मोड होते, पण या समस्येचा तुम्ही वारंवार सामना करत असाल तर शरीर तुम्हाला गंभीर संकेत देतंय; त्याकडे दुर्लक्ष करू नका. झोप मोड होण्यामागील कारणे आणि अशा वेळेस काय करावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
रात्रीची झोप मोड होण्यामागील कारणे (Reason Of Sleep Disruption At Night)
रात्रीच्या वेळेस झोप मोडण्यामागील कारणं असंख्य असू शकतात. शारीरिकपासून ते मानसिक कारणांसह काही आजारही कारणीभूत असू शकतात.
वाढते वय
वाढत्या वयोमानानुसार झोपेवर परिणाम होऊ शकतात. जसेजसे वय वाढते तसतसे शरीराच्या झोपेच्या घड्याळ्यावरही परिणाम होतो. परिणामी रात्रीअपरात्री जाग येते.
तणाव
मानसिक ताणतणावामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतात, यामुळे झोप मोड होते. तज्ज्ञांच्या मते घाबरुन तुम्ही झोपेतून जागे झाल्यास रक्तदाबाच्या पातळीमध्ये बदल होतो आणि हृदयाच्या ठोक्यांची गतीही वाढते.

Photo Credit: Pexels
औषधांचे दुष्परिणाम
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या औषधांमुळेही झोपेवर परिणाम होऊ शकतात. सर्दी-खोकल्याची औषधे तसंच नैराश्य कमी करण्यासाठी सुरू असलेल्या औषधोपचारांमुळेही रात्रीची झोप मोड होऊ शकते.
यकृताशी संबंधित समस्या
यकृताची कार्यप्रणाली योग्य प्रकारे सुरू नसणे, हे देखील रात्री 1 वाजेपासून ते 3 वाजेदरम्यान झोप मोड होण्यामागील कारण असू शकते. यकृत योग्य पद्धतीने काम करत नसल्यास रक्ताभिसरण प्रक्रियेवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे झोप मोड होऊ शकते. तणावामुळेही यकृताच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतात.
झोप मोड होण्यामागील अन्य कारणं
रात्रीची झोप मोड होण्यामागे अन्य असंख्य कारणंही असू शकतात. उदाहरणार्थ संधिवात, नैराश्य, न्युरोपॅथी मेनोपॉज, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होणे, थायरॉइड ग्रंथींमुळे झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे स्लीप एपनिया यासारख्या आजाराचाही सामना करावा लागू शकतो.
रात्रीची झोप मोड झाल्यास काय करावे? (What To Do If You Wake Up At Night)
- रात्रीच्या वेळेस झोप मोड झाल्यास सर्वप्रथम शांत राहावे आणि जास्त ताण घेऊ नका.
- झोप का येत नाहीय, याचा विचार करुन वारंवार घड्याळ पाहणे, यामुळे चिंता, तणाव अधिक वाढू शकतो.
- झोप येत नसल्यास दीर्घ श्वास घ्यावा आणि मेडिटेशन करावे.
- तुमच्या रुम आणि पलंगाची परिस्थिती देखील झोप न येण्यास कारणीभूत ठरू शकते.
- रुम आणि पलंग स्वच्छ असणं आवश्यक आहे.
- पलंगावर पडून राहा, हळूहळू श्वास घ्या आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करा.
- मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर करणं टाळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world