- उन्हाळ्यात घरगुती ताक पिणे शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि उष्माघात टाळण्यास मदत करते
- ताकामध्ये असणारे प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात आणि गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांपासून मुक्त करतात
- ताक रक्ताभिसरण सुधारते, हाडे मजबूत करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला आणण्यास मदत करते
सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यात उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. अशा स्थितीत शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेकदा थंड पेयांकडे वळतो. मात्र, बाजारातील शीतपेयांपेक्षा घरगुती 'ताक' हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. नॅशनल हेल्थ मिशनच्या अहवालानुसार, शीतपेयांमधील अतिसाखर शरीरास घातक ठरू शकते, त्याऐवजी ताक हा एक सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणे हे आरोग्यासाठी चांगले समजले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिऊन तुम्ही तुमचे आरोग्य जपू शकता.
दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. ताकामध्ये असणारे प्रोबायोटिक्स आंतड्यांमधील उपयुक्त बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. त्याच सोबत ताकामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच, नियमित ताक प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावरील मुरुमे किंवा डाग कमी होऊन नैसर्गिक तजेला येतो. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, त्याची कमतरता ताक भरून काढते.
उन्हाळ्यातील सुपरड्रिंक म्हणून ताकाकडे पाहीले जाते. वाढत्या तापमानामुळे हैराण झाला आहात का? फ्रीजमधील थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याऐवजी ताकाचा आहारात समावेश करा. ताक हे केवळ तहान भागवत नाही, तर शरीराला आतून थंडावा देते. दह्यापासून तयार केलेले हे नैसर्गिक पेय डिहायड्रेशनपासून आपला बचाव करते. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी ताक हा उत्तम पर्याय आहे. यात कॅलरीज कमी असतात आणि ते प्यायल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. ताकामध्ये जिरे पूड, सैंधव मीठ आणि पुदिना टाकल्यास त्याची चव आणि गुणधर्म दोन्ही वाढतात.
उन्हाळ्यात अनेकदा अपचन किंवा चक्कर येण्याचे प्रकार घडतात. रोजच्या आहारात ताकाचा वापर केल्यास पोटातील उष्णता शांत होते. पोटाची स्वच्छता करण्यासाठी आणि अन्नाचे पचन सुलभ करण्यासाठी ताकासारखे दुसरे सोपे औषध नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की घराघरात थंड पदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी चहा किंवा कॉफीला फाटा देऊन घरच्या घरी बनवलेले ताक पिणे सर्वात उत्तम. आयुर्वेदामध्ये ताकाला विशेष महत्त्व दिले असून, ते शरीरातील त्रिदोष शांत करण्यास मदत करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात दिवसातून किमान 1 ते 2 ग्लास ताक प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते आणि उष्णतेमुळे होणारे आजार लांब राहतात. हाडांच्या मजबूतीसाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी ताक पिणे फायदेशीर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world