Stale Dough Side Effects: भारतामध्ये प्रत्येक घरात स्वयंपाकामध्ये पोळीचा समावेश असतोच. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आणि वेळेअभावी आपण अनेकदा एकाच वेळी जास्त पीठ मळून ते फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. अनेकदा रात्रीचे उरलेले पीठ सकाळी वापरले जाते. तुम्हीही असेच करत असाल, तर या लेखातील माहिती तुमच्यासाठीच आहे. फ्रिजमध्ये ठेवलेल्या म्हणजेच शिळ्या पिठाच्या पोळ्या खाण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, ते जाणून घेऊया.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाची पोळी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?
शिळ्या पिठाच्या पोळ्या दिसायला कदाचित चांगल्या वाटतील, पण पोटात गेल्यावर अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
- पोटात गॅस होणे: शिव्या पिठाची पोळी पचायला जड असते. यामुळे पोट फुगणे, गॅस होणे आणि जडपणा जाणवणे या समस्या उद्भवू शकतात.
- बद्धकोष्ठता (Constipation): ताज्या पिठातील फायबर आणि पोषकतत्त्वे शरीराला फायदेशीर ठरतात, पण शिळ्या पिठातील पोषकतत्त्वे नष्ट होऊ लागतात, ज्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते.
- फुड पॉयझनिंग: जर पीठ जास्त जुने असेल, तर त्यामुळे फुड पॉयझनिंग होऊ शकते, परिणामी उलट्या किंवा जुलाब होण्याची शक्यता असते.
आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगते?
आयुर्वेदानुसार जेवण नेहमी ताजे आणि गरमच असावे. मळलेले पीठ शरीरासाठी तामसिक मानले जाते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पीठ ओले करून ठेवल्यास त्यातील कार्बोहायड्रेट्सचे विघटन होऊ लागते, ज्यामुळे त्याचे पोषण मूल्य कमी होते.
(नक्की वाचा: Fennel Seeds Water Benefits: गॅस, ॲसिडिटी, फॅटपासून हवीय सुटका? सलग 15 दिवस प्या हे पाणी, संपूर्ण शरीरच बदलेल)
फ्रिजमध्ये पीठ ठेवताना या गोष्टींची काळजी घ्या- एअरटाइट कंटेनर: पीठ नेहमी घट्ट झाकण असलेल्या डब्यात ठेवा, जेणेकरून बाहेरील हवा आणि बॅक्टेरियांचा संपर्क येणार नाही.
- तेल किंवा तूप: पिठाच्या वरच्या थराला हलके तेल किंवा तूप लावा, यामुळे पीठ सुकून कडक होणार नाही.
- 8-10 तास: पोळ्यांचे पीठ एकाच वेळेस संपेल याची काळजी घ्यावी. जास्त वेळ पीठ ठेवून त्यापासून तयार केलेल्या पोळ्या खाल्ल्यास आजाराला आमंत्रण मिळू शकते.
पिठात बॅक्टेरिया कधी वाढू लागतात?
तज्ज्ञांच्या मते, जसे आपण पिठात पाणी मिसळतो तसे त्यात रासायनिक बदल सुरू होतात. जर तुम्ही पीठ मळून किचनच्या ओट्यावर किंवा फ्रिजमध्ये तास-न्-तास ठेवले, तर त्यात किण्वन (Fermentation) प्रक्रिया सुरू होते. पिठाला बुरशी येऊ शकते. फ्रिजमुळे पीठ थंड राहत असले तरीही ते बॅक्टेरियांची वाढ पूर्णपणे रोखू शकत नाही. पिठाचा रंग काळपट पडणे किंवा त्याला आंबट वास येणे हे पीठ खराब झाल्याचे संकेत आहेत.

Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world