भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड गाड्यांची क्रेझ वेगाने वाढत असताना, जगातील आघाडीची ईव्ही कंपनी BYD ने एक मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपले जागतिक स्तरावर प्रचंड यशस्वी ठरलेले DM-i हायब्रीड तंत्रज्ञान (Dual Mode-Intelligent) अधिकृतपणे भारतात सादर केले आहे. या तंत्रज्ञानावर आधारित गाड्या केवळ एका सिंगल चार्जमध्ये आणि फुल इंधन टँकमध्ये 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करू शकतात. म्हणजेच, मुंबई ते नागपूर आणि पुन्हा अर्ध्या रस्त्यापर्यंतचा प्रवास कोणत्याही अतिरिक्त चार्जिंग किंवा इंधनाशिवाय एकाच फेरीत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
1200 किमी मायलेज देणारे 'इलेक्ट्रिक-फर्स्ट' तंत्रज्ञान
आतापर्यंत भारतात उपलब्ध असलेल्या बहुतांश हायब्रीड गाड्या प्रामुख्याने पेट्रोल इंजिनवर चालतात. मात्र, BYD चे DM-i हे एक प्रगत 'प्लग-इन हायब्रीड' (PHEV) तंत्रज्ञान आहे, जे 'इलेक्ट्रिक-फर्स्ट' या तत्त्वावर काम करते. याचा अर्थ असा की, शहरातील रोजच्या प्रवासादरम्यान ही गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक कार (EV Mode) म्हणून धावेल. जेव्हा तुम्हाला लांबच्या प्रवासाला जायचे असेल, तेव्हाच याचे इंजिन बॅकअप म्हणून सुरू होईल. बॅटरी आणि इंजिनच्या याच अफाट समन्वयामुळे ही गाडी 1200 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे.
(नक्की वाचा- Hero Flex Fuel Bike: पेट्रोलपेक्षा 20 रुपये फ्लेक्स-फ्यूल बाईक किती परवडेल? जाणून घ्या संपूर्ण बचतीचे गणित)
भारतातील वाहतुकीची पद्धत बदलणार
या क्रांतिकारी तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना BYD इंडियाचे प्रमुख राजीव चौहान म्हणाले की, "भारतात DM-i तंत्रज्ञान आणणे हे आमच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने पडलेले सर्वात मोठे पाऊल आहे. हे तंत्रज्ञान दैनंदिन वापरासाठी पूर्णपणे इलेक्ट्रिक ड्रायव्हिंगचा आनंद देते आणि त्याच वेळी लांबच्या प्रवासासाठी इंजिनचा उत्तम सपोर्ट देते. यामुळे भारतीय ग्राहकांच्या मनातील चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची आणि मायलेजची भीती कायमची दूर होईल."

3 ड्रायव्हिंग मोड्स आणि इंजिनची ताकद
या सिस्टमच्या केंद्रस्थानी 1.5 लीटर क्षमतेचे 'श्याओयुन' पेट्रोल इंजिन आहे, ज्याची थर्मल कार्यक्षमता तब्बल 43.04% आहे. हे इंजिन BYD च्या प्रसिद्ध 'ब्लेड बॅटरी' (Blade Battery) आणि इलेक्ट्रिक मोटर्ससोबत एकत्र काम करते. हे तंत्रज्ञान 3 मोड्समध्ये चालते.
- EV Mode:गाडी पूर्णपणे बॅटरी आणि इलेक्ट्रिक पॉवरवर चालते.
- HEV Series Mode: पेट्रोल इंजिन केवळ जनरेटरसारखे काम करून बॅटरी चार्ज करते आणि चाके इलेक्ट्रिक मोटरद्वारेच फिरतात.
- HEV Parallel Mode: हायवेवर ओव्हरटेकिंग करताना किंवा वेग हवा असल्यास पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही मिळून गाडीला ताकद देतात.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)
कंपनीचा दावा आहे की, DM-i तंत्रज्ञानावर चालणाऱ्या गाड्या केवळ 5.5 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकतात. तसेच, पेट्रोल आणि बॅटरीच्या पूर्ण क्षमतेसह ही गाडी 1200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास एकाच वेळी करू शकते. यात वापरण्यात आलेली लिथियम आयन फॉस्फेट (LFP) प्रकारची 'ब्लेड बॅटरी' अत्यंत सुरक्षित, टिकाऊ आणि थर्मल स्टेबिलिटीसाठी जगभरात ओळखली जाते.
BYD चे जागतिक वर्चस्व आणि भारतातील विस्तार
BYD ने 2008 मध्ये जगातील पहिली मास-प्रॉडक्शन प्लग-इन हायब्रीड कार लाँच केली होती. आजपर्यंत कंपनीने जगभरात 80 लाखांपेक्षा जास्त प्लग-इन हायब्रीड गाड्या विकल्या असून जागतिक PHEV बाजारपेठेत कंपनीचा वाटा 35% पेक्षा जास्त आहे.
भारतात सध्या BYD कडे BYD Seal, BYD Sealion 7, BYD Atto 3 आणि BYD eMax 7 या गाड्याआहेत. 40 शहरांमधील 48 शोरूम्सच्या माध्यमातून कंपनीने भारतात 14,000 पेक्षा जास्त ग्राहकांचा टप्पा ओलांडला असून, आगामी 'Seal U SUV' मुळे कंपनी भारतातील टोयोटा फॉर्च्युनर, जीप मेरिडियन आणि स्कोडा कोडियाक सारख्या प्रीमियम गाड्यांना तगडे आव्हान देणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world