जाहिरात

Chandra Grahan 2026: ग्रहणाचा वाईट प्रभाव टाळायचाय? मग चंद्रग्रहण संपल्यानंतर लगेच करा हे सोपे उपाय

Chandra Grahan 2026: हिंदू धर्मात ग्रहणाची घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याचा परिणाम केवळ खगोलशास्त्रीय नसून तो देश-जग आणि सर्व 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत असतो.

Chandra Grahan 2026: ग्रहणाचा वाईट प्रभाव टाळायचाय? मग चंद्रग्रहण संपल्यानंतर लगेच करा हे सोपे उपाय
Chandra Grahan 2026: या वर्षातील हे पहिलेच चंद्र ग्रहण आहे.
मुंबई:

Chandra Grahan 2026: हिंदू धर्मात ग्रहणाची घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याचा परिणाम केवळ खगोलशास्त्रीय नसून तो देश-जग आणि सर्व 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत असतो. 2026 सालातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण आज (3 मार्च) असून भारतातही दिसणार आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हे ग्रहण लागत असल्याने याला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. तो ग्रहण सुटेपर्यंत कायम असतो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आणि मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवले जातात. ग्रहणाच्या काळात नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर पसरलेली असते, असे मानले जाते. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर काही खास गोष्टी करणे फायदेशीर ठरते.

चंद्रग्रहणाची वेळ आणि सूतक काळ

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होणार आहे. हे ग्रहण संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांनी समाप्त होईल. 

ग्रहण काळ संपल्यानंतर स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे ग्रहण काळात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शुभ फळांची प्राप्ती होते. ग्रहण संपल्यानंतर नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात, याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

( नक्की वाचा : Chandra Grahan 2026: वर्षातील पहिले चंद्र ग्रहण, सुतक काळापासून ते राशीभविष्यापर्यंत; वाचा 10 प्रमुख मुद्दे )

घरची स्वच्छता आणि नकारात्मकता दूर करणे

चंद्रग्रहण संपल्यानंतर सर्वात आधी घर झाडून घ्यावे आणि त्यानंतर फरशी पुसून घ्यावी. फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ टाकल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. मीठ हे नकारात्मकता शोषून घेण्याचे काम करते, असे मानले जाते.

स्वतःचे शुद्धीकरण आणि स्नान

ग्रहण काळ संपल्यानंतर स्वतःचे शुद्धीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ग्रहण सुटताच अंघोळ करावी. असे केल्याने आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन आणि मेंदू शांत राहतो. ग्रहणाच्या काळात शरीरावर होणारे सूक्ष्म परिणाम स्नानामुळे धुवून निघतात.

( नक्की वाचा : Amravati News: 75 वर्षांपासून 'या' गावात विकला गेला नाही एकही रंग; पिचकारी शोधूनही सापडणार नाही, काय आहे गूढ? )

दानाचे महत्त्व आणि चंद्र दोष निवारण

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या समाप्तीनंतर दान केल्यास त्याचे अनेक पटीने फळ मिळते. ज्यांच्या कुंडलीत चंद्र दोष आहे, त्यांनी तांदूळ, दूध, साखर, पीठ, पांढरे कापड किंवा पांढऱ्या मिठाईचे दान करावे. दोष जास्त असेल तर मोती किंवा चांदीच्या वस्तूचे दान करणे देखील अत्यंत लाभदायी मानले जाते.

घराचे शुद्धीकरण आणि गंगाजल

घराची स्वच्छता केल्यानंतर संपूर्ण घराचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी घरातील देवघर, तुळशीचे रोप आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे. गंगाजल हे पवित्र मानले जात असल्याने त्यामुळे घरातील वातावरण पुन्हा सात्त्विक होण्यास मदत होते.

धूप आणि दिव्याचा वापर

सफाई आणि शुद्धीकरण झाल्यानंतर देवापुढे शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तसेच घरामध्ये धूप किंवा अगरबत्ती जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. यामुळे वातावरणातील उरलीसुरली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता वाढते.

ताजे जेवण आणि अन्नाची शुद्धता

 तुम्ही सूतक काळापूर्वी जेवण बनवले असेल आणि त्यात तुळशीचे पान टाकले नसेल, तर असे अन्न ग्रहण संपल्यानंतर खाऊ नये. ग्रहण संपल्यानंतर ताजे अन्न तयार करूनच त्याचे सेवन करावे. अन्नाच्या बाबतीत ही खबरदारी घेणे आरोग्यासाठी आणि धार्मिकदृष्ट्याही योग्य मानले जाते.

गायीला खाऊ घालणे

चंद्रग्रहण संपल्यानंतर जे अन्न तयार केले जाईल, त्यातील पहिली भाकरी किंवा पोळी गायीसाठी काढावी. रात्रीच्या वेळी गायीला खाऊ घालणे शक्य नसेल, तर ती भाकरी बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी गायीला द्यावी. असे केल्याने ग्रहणामुळे लागणाऱ्या दोषांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य लाभते.

स्पष्टीकरण : ही बातमी धार्मिक मान्यता आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. NDTV नेटवर्क याची पृष्टी करत नाही. त्याची जबाबदारी घेत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com