Weight Loss Habits : वजन कमी करणे हे अनेकांसाठी एक मोठे स्वप्न असते, पण त्यासाठी नेमकी सुरुवात कुठून करावी हे समजत नाही. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंजली सचान या कंटेंट क्रिएटरने अवघ्या 2 महिन्यांत तब्बल 20 किलो वजन कमी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने हा बदल कोणत्याही महागड्या डाएट उत्पादनांशिवाय, केवळ घरगुती जेवण आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या जोरावर करून दाखवला आहे.
कॅलरी डेफिसिट आणि साध्या जेवणाची जादू
अंजलीच्या मते, वजन कमी करण्याच्या प्रवासातील सर्वात मोठा मंत्र म्हणजे कॅलरी डेफिसिट. म्हणजेच शरीराला दिवसाला लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा थोड्या कमी कॅलरीज अन्नातून घेणे. तिने आपल्या आहारात प्रथिनांचे (Protein) आणि फायबरचे प्रमाण वाढवले, तर कर्बोदकांचे (Carbs) प्रमाण कमी केले. विशेष म्हणजे तिने साखर आणि बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद केले होते. साध्या घरगुती सवयी कशा प्रकारे शरीरात मोठा बदल घडवून आणू शकतात, याचे उत्तम उदाहरण तिने मांडले आहे.
( नक्की वाचा : Milind Soman: 60 व्या वर्षी समुद्राला नमवलं! मिलिंद सोमणच्या 'सुपर फिट' राहण्याचं गुपित उघड ! )
अंजलीने पाळलेल्या 'त्या' 12 महत्त्वाच्या सवयी
अंजलीने आपल्या पोस्टमध्ये 12 अशा नियमांची यादी दिली आहे, ज्याचे तिने अत्यंत कठोरपणे पालन केले. ही यादी खालीलप्रमाणे आहे:
1 कॅलरी डेफिसिट (कमी कॅलरीज घेणे, हा सर्वात मुख्य भाग आहे)
2 आहारात भरपूर प्रथिने आणि फायबरचा समावेश
3 कर्बोदके किंवा पिष्टमय पदार्थांचे कमीत कमी सेवन
4 साखरेचा त्याग (मिठाई आणि शीतपेये पूर्णपणे बंद)
5 तेल आणि मिठाचा वापर कमी करणे
6 दररोज 15,000 पावले चालणे
7 उपवास (इंटरमिटंट फास्टिंग करणे)
8 वेट ट्रेनिंग किंवा वजन उचलण्याचा व्यायाम
9 वेळेवर झोपणे
10 कधीकधी दिवसातून एकदाच जेवणे (गरज भासल्यास)
11 संध्याकाळी 6 वाजल्यानंतर जेवण न करणे
12 मधल्या वेळेत काहीही अनावश्यक पदार्थ न खाणे
( नक्की वाचा : Karisma Kapoor :21 वर्षांची झाली करिश्मा कपूरची मुलगी, वडिलांची होती लाडकी लेक, भावाशी खास बॉन्डिंग, Photos )
घरगुती आहारावर विशेष भर
अंजलीने वजन कमी करण्यासाठी महागड्या डाएट फूडचा आधार घेतला नाही. तिने शाकाहारी लोकांसाठी पनीर भुर्जी, टोफू, सोया चंक्स, कडधान्यांचे सॅलड, ओट्स, मूग डाळ आणि बेसनाचे धिरडे, राजमा आणि भाज्यांचे सूप यावर भर दिला. मांसाहारी लोकांसाठी तिने अंडी, चिकन आणि मासे यांसारख्या प्रथिनांनी युक्त पदार्थांचा समावेश केला. हे सर्व पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात, ज्यामुळे हा डाएट प्लॅन कोणालाही पाळणे सोपे जाते.
सातत्य आणि तज्ज्ञांचा सल्ला
"जर तुम्हाला महिन्यातून 8 ते 10 किलो वजन कमी करायचे असेल, तर हे नियम पूर्ण शिस्तीने पाळावे लागतील. सातत्य हीच बदलाची गुरुकिल्ली आहे," असे अंजलीने स्पष्ट केले आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इतक्या वेगाने वजन कमी करणे प्रत्येकाच्या शरीरासाठी योग्य असेलच असे नाही. प्रत्येकाची जीवनशैली आणि प्रकृती वेगळी असते, त्यामुळे कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम ठरते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world