
- तनुजा रिंगणे, अंक/वास्तूशास्त्रतज्ज्ञ
Deep Amavasya 2025 Date And Time: हिंदू संस्कृतीत दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) ज्यास आषाढी अमावस्या असेही संबोधले जाते, हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो आणि यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. यंदा 24 जुलै रोजी दर्श अमावस्या आहे या लेखाद्वारे आपण दीप अमावस्येचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व तसेच त्यामागील परंपरा आणि कथांचा सविस्तर माहिती जाणून घेऊया.
दिव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो. देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे होय.
प्रकाशाचा अर्थ : दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो. ती नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते, तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते.
दैनंदिन जीवनातील स्थान : प्रत्येक शुभ कार्यामध्ये मग ते देवाची पूजा, आरती, वाढदिवसाचे औक्षण किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात असो, दीपप्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे.
प्राणज्योतीचे प्रतीक: आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते. म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन आहे.
दीप अमावस्येचे विशेष महत्त्व
आषाढ अमावस्या जी दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) म्हणून साजरी केली जाते. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व पणती, समई आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते.
दीपपूजन
- या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन, त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात. काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळही दिवे लावले जातात.
- दीप पूजनामुळे (Deep Pujan 2025) घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो, असेही म्हणतात.
- गोडाचा नैवेद्य अर्पण करून आणि चातुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो.
श्रावणाचे स्वागत
दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या (Shravan Mahina) आगमनाची तयारी आहे. श्रावणात अनेक सण, व्रत आणि उत्सव असतात, ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते. दीप पूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते.
(नक्की वाचा - Deep Amavasya Naivedya : दीप अमावस्येला दिवे खाण्याची प्रथा काय आहे? कणकेचे की बाजरीचे कुठल्या दिव्याचा नैवेद्)य
पितृ तर्पण
हा दिवस पितरांच्या पूजेसाठीही योग्य मानला जातो. पितृ तर्पणामुळे घरातील पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.
देवी लक्ष्मी आणि दुर्गा पूजन
काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि माता दुर्गेची पूजा केली जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि रक्षण मिळते.
दीप अमावस्येची कथा (Deep Amavasya Katha)
एका नगरीत एक राजा आणि त्याची सून राहत होती. ही सून दररोज श्रद्धेने देवपूजा आणि दीप पूजन करत असे. एकदा तिने चोरून अन्न खाल्ले आणि याबद्दल विचारणा झाल्यावर तिने खोटे बोलून उंदरांवर आरोप लावला. याचा राग येऊन उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात ठेवली, ज्यामुळे तिची बदनामी झाली आणि तिला घरातून हाकलून देण्यात आले.
काही काळानंतर राजा शिकारीवरून परतत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडावर सर्व दिवे एकत्र बोलताना पाहिले. ते आपापसात गोड नैवेद्य आणि पूजेबद्दल चर्चा करत होते, पण राजाच्या घरातील दिवा उदास होता. त्याने सांगितले की, राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबली आहे. हे ऐकून राजाने घरी परत येऊन तपास केला आणि राणी निर्दोष असल्याचे कळले. त्याने तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरीत परत आणले. राणीच्या दीप पूजनामुळे तिच्यावरील संकट टळले. ही आहे दीप अमावस्येची कथा.
दीप अमावस्येला काय करावे?
- घराची स्वच्छता: घर स्वच्छ करून, रांगोळी काढून आणि फुलांचे तोरण लावावे.
- दीप प्रज्वलन : मातीचे किंवा धातूचे दिवे तेल/तूप लावून प्रज्वलित करावे . घरामध्ये, तुळशीजवळ आणि दारात दिवे लावावेत.
- पूजा आणि मंत्र पठण: देवतांची पूजा, पितृ तर्पण आणि मंत्रांचे पठण करावे.
- नैवेद्य: गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आणि कथांचे वाचन करावे.
।।शुभंकरोती कल्याणम्।।
।।आरोग्यम् धनसंपदा।।
।।शत्रुबुद्धी विनाशाय।।
।।दीपज्योती नमोस्तुते ।।
।। दिव्या दिव्या दिपत्कार ।।
।। कानी कुंडल मोती हार।।
।।दिवा लावला देवापाशी।।
।।उजेड पडला तुळशीपाशी।।
।।माझा नमस्कार श्रीकृष्णाशी।।
दीप अमावस्या 2025 कधीपासून सुरू होतेय?23 जुलै उत्तररात्री 2.29 am ते 24 जुलै समाप्ती रात्री 12.41 am पर्यंत दर्श अमावस्या आहे.
"गटारी" हा गैरसमज?आजकाल काही लोक आषाढी अमावस्येला "गटारी अमावस्या" (Gatari Amavasya) म्हणतात आणि श्रावणापूर्वी मांसाहार किंवा मद्यपानाच्या पार्ट्या करतात. पण हा एक गैरसमज आहे. गटारी हा शब्द गतहारी या शब्दाचा अपभ्रंश आहे. गत म्हणजे होऊन गेलेले असा या शब्दाचा अर्थ होतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world