Dev Uthani Ekadashi 2025: कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षाच्या एकादशी तिथीस देवउठनी एकादशी तसेच प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी व्रत केल्यास चांगले फळ मिळतात, अशी मान्यता आहे. भगवान विष्णूची विधीवत पूजा केल्यास सुखसमृद्धी, सौभाग्य, संपत्ती आणि समृद्धीसह सर्व आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते. एकादशी व्रताचे पालन केल्यास पापदोष, कष्ट दूर होऊन सुखसमृद्धीचा वर्षाव होतो. भगवान श्री विष्णू यांच्या कथेचे पठण करताच देव प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतात, असेही मानले जाते.
देवउठनी एकादशी व्रत कथा
हिंदू मान्यतेनुसार, कोणे एकेकाळी एक अतिशय धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा होता. राजाप्रमाणेच त्याची प्रजाही धर्म-कर्मावर विश्वास ठेवणारी होती आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाचा वर्षाव करणाऱ्या एकादशीच्या व्रताचे पालन येथे सर्वसामान्यांपासून श्रीमंत लोकांपर्यंत सर्वचजण करत असत. अन्नाचे सेवन न करता लोक भगवान विष्णूंची पूजा करत. एकदा एक बेरोजगार तरुण राजाच्या राज्यात आला आणि त्याने राजाकडे काम मागितले.
राजाने तरुणासमोर ठेवली ही अट
तेव्हा राजाने तरुणाला सांगितले की, राज्यामध्ये एकादशीच्या दिवशी कोणीही अन्नाचे सेवन करत नाही, या दिवशी केवळ फळांचे सेवन करुन व्रत केले जाते. त्या ही अट स्वीकारली आणि काम करण्यास सुरुवात केली. पण व्रताच्या दिवशी भूक सहन न झाल्याने त्याने राजाकडून अन्नाचे सेवन करण्याची परवानगी मागितली. सुरुवातीस राजाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तरुणाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही त्यावेळेस राजाने त्याला रोखले नाही. यानंतर नदीमध्ये स्नान करुन तरुणाने अन्न शिजवले आणि मोठ्या भक्तिभावाने भगवान विष्णूला साद घातली, हे प्रभू या! भोजन तयार आहे.
भक्ताने घातलेली भावनिक साद ऐकताच श्री विष्णू धावत आले
आपल्या भक्ताचे भावनिक आवाहन ऐकून भगवान विष्णू यांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याच्यासमोर दिव्य स्वरुपात प्रकट झालेच शिवाय तरुणासोबत भोजनही केले. यानंतर ते गायब झाले. काही दिवसांनंतर पुन्हा एकादशी आली, त्यावेळेस तरुणाने राजाकडून दुप्पट स्वरुपात अन्नाची मागणी केली. तेव्हा राजाने यामागील कारण विचारलं. तरुणाने सांगितले की, मागील एकादशीच्या दिवशी त्याने तयार केलेले भोजन सेवन करण्यासाठी स्वतः भगवान विष्णू आले होते. त्यावेळेस जेवण थोडेसे कमी पडले होते. तो जे काही सांगत होता ते ऐकून राजा आश्चर्यचकित झाला की इतके वर्ष नियमाने व्रत करूनही त्याने कधीही भगवान विष्णूंना पाहिले नाही, पण भगवंत स्वतःहून या तरुणाकडे आले. पुढील एकादशी आली त्यावेळेस राजा स्वतः तरुणासोबत गेला आणि एका झाडाखाली लपून बसला.
(नक्की वाचा: Dev Uthani Ekadashi 2025 Shubh Muhurat: देवउठनी एकादशी तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या)
राजाली समजली खरी भक्ती
यावेळेसही तरुणाने स्नान केल्यानंतर मनापासून भोजन तयार केले आणि श्री विष्णूंना आवाहन केले, पण ते आले नाहीत. दिवस उलटून गेल्यानंतर दुःखी होऊन तो म्हणाला की, "प्रभू जर तुम्ही आले नाहीत तर मी माझे प्राण सोडेन." तो जसा नदीजवळ आला तसे भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी तरुणासोबत भोजन केले. भाविकाच्या भक्तीने श्री विष्णू इतके प्रसन्न झाले की त्यांनी तरुणाला आपल्या वाहनात बसवलं आणि त्याला वैकुंठ धाममध्ये घेऊन गेले.
ही घटना पाहिल्यानंतर राजाला खूप दुःख झाले की त्याचे मन इतके वर्षे उपवासाच्या नियमांमध्ये अडकले होते. भगवान विष्णू तर खऱ्या भक्तीने प्रसन्न होतात. राजाला एकादशी व्रताचे खरे सार समजले आणि त्यानंतर त्याने व्रत पूर्ण भक्तीने पाळले आणि सर्व सुखांचा आनंद घेतल्यानंतर त्याला वैकुंठ प्राप्त झाले.
(नक्की वाचा: List Of Ekadashi In November 2025: नोव्हेंबरमध्ये कधी-कधी आहे एकादशीचे व्रत? तिथी आणि पारणाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

