Magh Purnima Upay In Marathi: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा तिथी फार महत्त्वाची मानली जाते. शुक्ल पक्षातील पंधराव्या तिथीला चंद्र आपल्या संपूर्ण कलांसह पूर्ण स्वरूपात असतो. या पवित्र तिथीला भगवान विष्णूंसह चंद्रदेवांची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. वर्षभर येणाऱ्या एकूण 12 पौर्णिमांपैकी माघ महिन्याच्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. सनातन परंपरेनुसार माघी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणते उपाय केल्यास इच्छा पूर्ण होते, हे सविस्तर जाणून घेऊया...
माघ पौर्णिमेचा महाउपाय | Magh Purnima 2026| Magh Purnima Mahaupay
1. हिंदू मान्यतेनुसार, जर तुम्ही माघ महिन्यात पुण्यदायिनी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगम तीरावर स्नान करू शकत नसाल, तर माघी पौर्णिमेच्या दिवशी श्रद्धा आणि विश्वासाने संगमात तीन डुबक्या मारल्यास संपूर्ण माघ महिन्याचे पुण्यफळ प्राप्त होते.
2. माघ पौर्णिमेचे पुण्यफळ मिळवण्यासाठी या दिवशी विधीवत व्रत ठेवून शुभ मुहूर्तावर भगवान श्री सत्यनारायणांची पूजा करावी. भगवान सत्यनारायणांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची कथा पठण करावी किंवा ऐकावी. त्यानंतर हवन -आरती करून मनातील इच्छा श्रीहरिसमोर मांडावी. मान्यतेनुसार भगवान सत्यनारायणांच्या पूजेमुळे मिळणारे पुण्य साधकाच्या सुख-समृद्धीत वाढ करते.
3. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब तुमच्यावर रुसले आहे तर त्यास प्रसन्न करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा करावी. माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर तुळशीला लाल रंगाचा कलावा बांधावा आणि शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून प्रदक्षिणा घालावी. हिंदू मान्यतेनुसार हा उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
(नक्की वाचा: Magh Purnima 2026 Date Shubh Muhurat: माघ पौर्णिमा तारीख, शुभ मुहूर्त, दानधर्म, पूजा कशी करावी? वाचा सविस्तर)
4. हिंदू धर्मामध्ये चंद्राला मनाचा कारक मानले जाते. जर तुमच्या कुंडलीत चंद्र दुर्बलस्थानी असेल आणि त्यामुळे त्रास वाढत असेल तर या दिवशी रात्री चंद्रदेवांची विशेष पूजा करावी. चंद्रदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रात्री तन-मनाने शुद्ध होऊन पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचे दर्शन तसेच पूजन करावे. माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवांना दूध-पाण्याचे अर्घ्य अर्पण करावे आणि ‘ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः' या मंत्राचा अधिकाधिक जप करावा.
5. माघ पौर्णिमेला स्नानासोबत दानालाही फार महत्त्व आहे. मान्यतेनुसार माघ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला गरजू व्यक्तीला किंवा मंदिरातील पुजाऱ्याला तीळ, उबदार कपडे, गूळ, तूप, फळे, धान्य, धन इत्यादी गोष्टींचे दान केल्यास पुण्यफळ प्राप्त होते. माघ पौर्णिमेला दान केल्याने साधकाच्या घरात धन-धान्य आणि सुख-सौभाग्यात वाढ होते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world