जाहिरात

Dhar Bhojshala: वसंत पंचमी पूजेदरम्यान ‘डमी नमाज’ ?, सुरू झाला नवा वाद

Dhar Bhojshala Basant Panchami: भोजशाला-कमाल मौलाना संकुलाचा वाद हा नवा नाही. हिंदूंचे म्हणणे आहे की ही वास्तू म्हणजे 11 व्या शतकातील राजा भोज यांनी बांधलेले वाग्देवी (सरस्वती) मंदिर आहे.

Dhar Bhojshala: वसंत पंचमी पूजेदरम्यान ‘डमी नमाज’ ?, सुरू झाला नवा वाद
धार:

Dhar Bhojshala Basant Panchami: मध्य प्रदेशातील अत्यंत संवेदनशील असलेल्या धार जिल्ह्यातील भोजशाला-कमाल मौलाना संकुलात यंदाची वसंत पंचमी शांततेत पार पडल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना प्रत्यक्षात एका मोठ्या वादाची ठिणगी पडली आहे. (What happened in Dhar Bhojshala on Vasant Panchami 2026?) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्याचे दाखवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चक्क 'डमी नमाज' अदा करण्यात आल्याचाआरोप स्थानिक मुस्लिम बांधवांनी केला आहे. या आरोपामुळे धारमधील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नक्की वाचा: हिंदू अभिनेत्रीला भररस्त्यात विवस्त्र करण्याचा प्रयत्न, रेप आणि ठार मारण्याची धमकी

नेमके काय झाले ?

धारमधील गुलमोहर कॉलनीचे रहिवासी इमरान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. इमरान खान यांनी म्हटले की, जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या 22 जानेवारी 2026 च्या आदेशाचे उल्लंघन करत स्थानिक मुस्लिमांना नमाज अदा करण्यापासून रोखले. खान यांनी माध्यमांना सांगितले की, "गुरुवारी रात्रीच उपजिल्हाधिकारी रोशनी पाटीदार आणि डीएसपी आनंद तिवारी यांनी आम्हाला सुरक्षेचे कारण सांगून सोबत नेले होते. शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळेत आम्हाला भोजशाळेत नमाजसाठी नेले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. आम्ही श्रद्धेपोटी नमाजसाठी नवीन कपडेही परिधान केले होते. मात्र, प्रत्यक्षात आम्हाला मशिदीच्या मागील भागात तब्बल 16 तास डांबून ठेवण्यात आले."

खान यांनी आणखी एक आरोप केला आहे, त्यांनी म्हटले आहे की,"आम्हाला एका बाजूला रोखून धरले असताना, प्रशासनाने काही अज्ञात व्यक्तींना मशिदीत नेले आणि त्यांना नमाज पढण्यास सांगितले. या व्यक्ती नमाज पढत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयात आदेशाचे पालन झाल्याचा पुरावा सादर करता येईल. ही केवळ मुस्लिमांचीच नाही, तर न्यायालयाचीही फसवणूक आहे."

नक्की वाचा: Nashik Crime: 2 हजारांच्या जुन्या नोटा.. 400 कोटींंचे 2 कंटेनर घाटात लुटले? 3 राज्यांना हादरवणारे प्रकरण काय?

आरोप बिनबुडाचे असल्याचा प्रशासनाचा दावा

धारचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांना ठराविक वेळेत पूजा करण्याची आणि नमाजसाठी परवानगी देण्यात आली होती. सूर्योदयापासून हिंदू भाविकांनी वसंत पंचमीनिमित्त 'अखंड पूजा' केली, तर दुपारी 1 ते 3 या वेळेत मुस्लिम समाजाला नमाजसाठी वेळ देण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होती. या संपूर्ण परिसरात 8 हजारांपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.  

मंदिर का मशीद, जुना वाद पुन्हा उफाळून आला 

भोजशाला-कमाल मौलाना संकुलाचा वाद हा नवा नाही. हिंदूंचे म्हणणे आहे की ही वास्तू म्हणजे 11 व्या शतकातील राजा भोज यांनी बांधलेले वाग्देवी (सरस्वती) मंदिर आहे.  मुस्लिम धर्माच्या लोकांचे म्हणणे आहे की ही वास्तू  सुफी संत कमालुद्दीन यांची मशीद आहे. दोन धर्मातील लोकांसाठी ही वास्तू आस्थेचा विषय बनली असल्याने इथे धार्मिक तेढ निर्माण होत असते. खासकरून वसंत पंचमीच्या दिवशी इथे मोठा तणाव असतो. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी एक आदेश दिला होता आणि सांगितले होते की, मुस्लिमांना नमाजसाठी वेगळी वेळ देण्यात यावी आणि त्यांच्यासाठीचे प्रवेशद्वार वेगळे असावे. हिंदूंना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूजा करता यावी यासाठीही योग्य ती तयारी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते.  
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com