Frequent Urination At Night Causes: रात्रीच्या वेळेस एक-दोनदा लघवीसाठी उठावे लागणे अनेकांसाठी सामान्य गोष्ट असू शकते, विशेषतः वाढत्या वयात. पण जर तुम्हाला दररोज रात्री दोन ते तीन वेळा किंवा त्याहून अधिक वेळा बाथरूमला जावे लागत असेल आणि यामुळे तुमची झोप वारंवार मोडत असेल, तर याकडे फक्त वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करू नये. अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर प्रनल सहारे (Dr. Pranal Sahare) यांच्या मते, रात्री वारंवार लघवी येणे हे शरीरात बळावत असलेल्या एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'नॉक्ट्युरिया' (Nocturia) म्हटले जाते. हे एक असे लक्षण आहे जे वेगवेगळ्या आरोग्य समस्यांकडे इशारा करू शकते. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये यामागील कारण वेगळे असू शकते, त्यामुळे तपासणीशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य नाही.
नॉक्ट्युरिया म्हणजे काय?
जर तुम्हाला रात्री झोपताना 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावे लागत असेल तर या स्थितीला 'नॉक्ट्युरिया' म्हणतात. यामुळे झोप वारंवार मोडते आणि दिवसा थकवा जाणवतो.
रात्री 2-3 वेळा लघवीला येणे सामान्य आहे का?
या प्रश्नाचे उत्तर सर्व लोकांसाठी एकसारखे नाही. तरुणांमध्ये पूर्ण रात्र लघवीसाठी उठावे न लागणे ही सामान्य गोष्ट आहे तर वय वाढण्यासोबत रात्री एकदा उठणे असामान्य मानले जात नाही. काही लोकांना दोनदाही उठावे लागू शकते. पण जर ही समस्या सतत जाणवत असेल, पूर्वीपेक्षा वाढली असेल किंवा यामुळे झोप पूर्ण होत नसेल आणि दिवसभर थकवा जाणवू लागला असेल तर याचे कारण शोधणे आवश्यक आहे. याच कारणामुळे डॉक्टर रुग्ण रात्री किती वेळा उठलाय? केवळ हेच पाहत नाही तर याचा त्याच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर किती परिणाम होत आहे, हे देखील समजून घेतात.
कोणत्या कारणांमुळे ही समस्या वाढू शकते?
रात्री वारंवार लघवी होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी किंवा इतर द्रव पदार्थ पिणे हे असू शकते. संध्याकाळच्या वेळी जास्त चहा, कॉफी पिणे किंवा मद्यपान करणे देखील याचे कारण बनू शकते. याशिवाय मधुमेह (डायबिटीज), पुरुषांमध्ये वाढलेला प्रोस्टेट ग्रंथीचा आकार (Enlarged Prostate), ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडर, युरिन इन्फेक्शन (मूत्रमार्गाचा संसर्ग), काही औषधांचे परिणाम, किडनी किंवा हृदयाशी संबंधित आजार आणि स्लीप अॅप्नियासारखे झोपेचे विकार (Sleep Disorders) देखील नॉक्ट्युरियाचे कारण असू शकतात. त्यामुळे जर ही समस्या दीर्घकाळापासून असेल तर फक्त पाणी कमी पिण्याने यावर तोडगा निघत नाही.
(नक्की वाचा: Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी, फायदेशीर काय? वेटलॉस आणि ब्लडशुगर कसे होईल कमी? जाणून घ्या सत्य)
चिंतेची बाब कधी असू शकते?
जर रात्री वारंवार लघवी येण्यासोबतच लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे, लघवीतून रक्त येणे, खूप जास्त तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, पायांवर सूज येणे, ताप येणे किंवा लघवी होण्यात अडचण येणे अशी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा. त्याचप्रमाणे जर दररोज रात्री अनेकदा झोप मोडू लागली असेल आणि दिवसभर डोळ्यांवर झापड येणे, चिडचिड होणे किंवा थकवा जाणवत असेल तरीही वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे असू शकते. अशा प्रकरणांमध्ये वेळेत आजाराचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे होते.
(नक्की वाचा: दिलजीत दोसांझ 10 वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त; सर्जरी का टाळली? बड्या डॉक्टरांनी दिला थेट धोक्याचा इशारा)
डॉक्टर यामागचे खरे कारण कसे शोधतात?
नॉक्ट्युरियाच्या तपासणीमध्ये डॉक्टर सर्वात आधी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास (Medical History), औषधोपचार आणि आहाराच्या सवयींबाबत माहिती घेतात. यानंतर गरज भासल्यास युरिन टेस्ट (लघवीची तपासणी), ब्लड शुगर टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट किंवा प्रोस्टेट आणि ब्लॅडरशी (मूत्राशय) संबंधित तपासण्या केल्या जाऊ शकतात. अनेकदा रुग्णाला काही दिवसांसाठी 'ब्लॅडर डायरी' ठेवण्याचा सल्लाही दिला जातो, जेणेकरून दिवसा आणि रात्री किती वेळा लघवी होत आहे आणि शरीरातून किती द्रव बाहेर पडत आहे, हे समजून घेता येईल.
लाइफस्टाइलमध्ये बदल केल्याने आराम मिळू शकतो का?
जर या समस्येच्या मागे कोणताही गंभीर आजार नसेल तर काही सोपे बदल आराम देऊ शकतात. झोपण्याच्या दोन-तीन तास आधी खूप जास्त द्रव पदार्थ पिणे टाळणे, संध्याकाळनंतर चहा आणि कॉफीचे प्रमाण मर्यादित करणे, मधुमेह आणि रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रणात ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांची योग्य वेळ ठरवणे फायदेशीर ठरू शकते. दुसरीकडे वारंवार लघवी येण्याची समस्या उद्भवल्यास स्वतःच्या मनाने औषध सुरू करणे किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहणे योग्य नाही. योग्य कारण स्पष्ट झाल्यानंतरच उपचार निश्चित केले पाहिजे.
वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने आणि आवश्यक तपासण्या केल्याने कारणाचा शोध घेतला जाऊ शकतो. अनेक प्रकरणांमध्ये केवळ जीवनशैलीत बदल केल्याने आराम मिळतो तर काही प्रकरणांमध्ये आजारावर उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे शरीराच्या अशा संकेतांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ते समजून घेणे आणि वेळेत पावले उचलणे कधीही उत्तम ठरू शकते.
डॉ. प्रनल सहारे हे जबलपूरमधील अनुभवी युरोलॉजिस्ट, रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक युरो सर्जन व युरो-ऑन्कोलॉजिस्ट आहेत. त्यांनी बी. जे. मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथून MCh आणि NBE, नवी दिल्ली येथून युरोलॉजीमध्ये DNB पदवी मिळवली आहे. ते प्रोस्टेट-किडनी-ब्लॅडर कॅन्सर, किडनी स्टोन (मुतखडा), पुरुषांमधील वंध्यत्व, रिकन्स्ट्रक्टिव्ह आणि पेडियाट्रिक युरोलॉजी यासारख्या आजारांवर प्रगत (Advanced) उपचार करतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world