
Friendship Day 2025: मैत्री हा असा बंध आहे, जो काळ आणि अंतर यांच्या पलीकडे टिकून राहतो. 1977/78 च्या सर एली कदुरी हायस्कूल (माझगाव, मुंबई) येथील SSC बॅचच्या 42 मित्र-मैत्रिणींचा ग्रुप हा याचं जिवंत उदाहरण आहे. 42 पैकी 16 जणांचा अगदी खास ग्रुप – विलास जाधव, संजय रिंगे, प्रशांत हजारे, सुधीर पंडित, आनंद चीपकर, विजय कदम, जालिंदर राऊत, वंदना साळवी, सुनिता मांडीये, ललिता परब, नोरा पेणकर, विजया पाटे, रोहिणी पाटील, उषा पंडित, सुनिता पाटेकर आणि हेमा देसाई या सर्वांनी 40 ते 45 वर्षांनंतर एकत्र येऊन मैत्रीच्या (Friendship Day 2025) आठवणी पुन्हा जिवंत ठेवल्या. "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" या म्हणीप्रमाणे हा ग्रुप शाळेतील बालपण पुन्हा अनुभवतो, ही मंडळी व्हाट्सअॅप ग्रुपद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहतात आणि वर्षातून दोनदा गेट-टुगेदरही करतात.
मैत्रीचे अविस्मरणीय क्षण: विश्वासाचा आधार
विलास जाधव यांनी सांगितलेला एक किस्सा मैत्रीचा खरा अर्थ अधोरेखित करतो. 40 वर्षांनंतर मुलुंडच्या मैदानात प्रशांत आणि सुधीर यांच्यासोबत झालेली भेट ही केवळ आठवणींना उजाळा देणारी नव्हती, तर ती विश्वास आणि जवळीकतेचे प्रतीक होती. मैदानातील बाकड्यावर बसून शाळेतील गमती-जमतींवर हसताना, सुधीर आणि प्रशांत यांच्याशी त्यांच्या कुटुंबातील एक दुःखद गोष्ट शेअर केली. ही खासगी गोष्ट सांगण्यामागे विलास जाधव यांचा मित्रांवर असलेला प्रचंड विश्वास दिसून येतो. खरंच आनंदाच्या गोष्टी सर्वांसोबत शेअर होतात, पण दुःख फक्त त्या मित्रासमोर उलगडलं जातं, जो खरोखर जवळचा असतो. हा क्षण विलास जाधव यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला आहे.
(नक्की वाचा: Happy Friendship Day 2025 Wishes And Quotes: सच्च्या मैत्रीचे पक्के नाते, फ्रेंडशिप डेनिमित्त पाठवा शुभेच्छा)
मैत्री जपण्याची कला
मैत्री (Friendship Day) टिकवण्यासाठी प्रशांत हजारे यांनी सांगितलेली पद्धत अतिशय प्रेरणादायी आहे. ग्रुपच्या पिकनिक किंवा भेटीगाठींसाठी मीटिंग घेतली जाते, पण यात कोणीही आपलं मत लादलं जात नाही. सर्वांच्या मतांचा आदर करून सामूहिक निर्णय घेतला जातो, ज्यामुळे वाद टाळले जातात आणि मैत्रीचं बंधन अधिक दृढ होतं. व्हाट्सअॅप ग्रुपद्वारे सतत संपर्क, वाढदिवसाला केक घेऊन सेलिब्रेशन, सणासुदीला एकमेकांच्या घरी भेटी आणि वर्षातून दोनदा गेट-टुगेदर हे सगळं या ग्रुपच्या एकजुटीचं प्रतीक आहे. नुकतंच नेरळच्या रीसॉर्टवर झोपाळे, घसरगुंडी यावर खेळताना सर्वांनी पुन्हा एकदा बालपण जगलं, जे या मैत्रीचं अनोखं वैशिष्ट्य आहे.

Photo Credit: NDTV Marathi
पुढच्या पिढीतील मैत्री
या ग्रुपची मैत्री केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नाही, तर ती पुढच्या पिढीतही पोहोचली आहे. या ग्रुपमधील मित्रमैत्रींच्या मुलांमध्येही चांगली मैत्री आहे आणि त्यांच्या भेटीगाठी नियमित होतात. ही परंपरा पुढे नेणं हे या ग्रुपच्या मैत्रीच्या यशाचं खरं लक्षण आहे. "आपली शाळा आपले बालपण" या ब्रीद वाक्याप्रमाणे हा ग्रुप केवळ स्वतःच्या आठवणी जपत नाही, तर त्या पुढच्या पिढीतही रुजवत आहे.
(नक्की वाचा : Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे कधी आहे? का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या मैत्री दिनाचे महत्त्व)
मैत्रीचा खरा अर्थ
हा 16 जणांचा ग्रुप आणि त्यांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम, विश्वास आणि सहकार्य हे मैत्रीचा खरा अर्थ सांगतं. अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करणं, वाढदिवस सुंदर ग्रीटिंग्जने साजरे करणं आणि बालपणाच्या आठवणींना उजाळा देणं, यातून मैत्री किती अनमोल आहे हे दिसतं. सीनियर सिटीझन असूनही या ग्रुपचा उत्साह आणि एकजूट ही प्रत्येकासाठी प्रेरणा आहे.
मैत्री (Friendship Day 2025) ही अशी संपत्ती आहे, जी कधीच कमी होत नाही. प्रशांत हजारे आणि त्यांच्या 16 जणांच्या ग्रुपची कहाणी आपल्याला शिकवते की, खरी मैत्री ही विश्वास, आदर आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात आहे. या मैत्री दिनानिमित्त, अशा सर्व मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा, ज्यांनी आपल्या आयुष्याला आनंद आणि अर्थ दिला आहे!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world