
Gudi Padwa 2025: गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नववर्षाचा शुभारंभ. चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा (Gudhipadwa 2025) सण साजरा केला जातो. या दिवशी घर स्वच्छ करुन दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. लहान-थोर सर्व मंडळी पारंपरिक कपडे परिधान करुन गुढी उभारुन तिची पूजा करतात. घराघरांत पारंपरिक स्वयंपाकही तयार केला जातो. गुढी उभारणे हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यंदा गुढीपाडवा सण कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि सणाचे महत्त्व जाणून घेऊया.
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीचा (Pratipada Tithi) शुभारंभ 29 मार्च रोजी संध्याकाळी 04:27 वाजता होणार असून 30 मार्च दुपारी 12:49 वाजता तिथी समाप्त होणार आहे. हिंदू धर्मामध्ये उदया तिथीचे विशेष महत्त्व आहे, त्यामुळे गुढीपाडवा सण (Gudhi Padwa 2025) 30 मार्च रोजी साजरा केला जाईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुढीपाडव्याची पूजा कशी करावी? (Gudi Padwa 2025 Puja Vidhi)
- पहाटे उठून अभ्यंगस्नान करावे आणि पारंपरिक कपडे परिधान करा.
- सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
- घरासमोर रांगोळी काढून दिवा लावा.
- घरासमोर गुढी उभारा आणि तिची पूजा करावी.
- गुढीला नैवेद्य अर्पण करावा.
- पारंपरिक भोजनासह श्रीखंड, पुरणपोळी असे गोड पदार्थही तयार करावे.
- गरजूंनाही दान करावे.
गुढी उभारण्याची शुभ दिशा (Gudhi Ubharnyache Shubh Disha)
गुढी पूर्व दिशेला उभारणे शुभ मानले जाते. कारण या दिशेला सूर्योदय होतो. म्हणूनच पूर्वे दिशेला शुभ, उर्जा आणि नव्या गोष्टींच्या शुभारंभाचे प्रतीक मानले जाते. याव्यतिरिक्त तुम्ही उत्तर-पूर्व दिशेमध्येही गुढी उभारू शकता, ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी नांदेल.
(नक्की वाचा: Gudi Padwa 2025 Wishes: गुढीपाडवा सणाच्या खास शुभेच्छा)
गुढीपाडव्याचे महत्त्व (Gudi Padwa Significance)
पौराणिक कथांनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती. तसेच या दिवशी वसंत ऋतूचाही शुभारंभ होतो. हा सण नवा उत्साह आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीचेही प्रतीक मानले जाते. हा उत्सव हिंदू धर्माची परंपरा, संस्कृती आणि शेतीचेही महत्त्व सांगतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world