
मुंबई: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज राज ठाकरेंची तोफ धडाडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना अनेक मुद्द्यांवरुन झोडपून काढले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका प्रयागराजमध्ये झालेला महाकुंभ मेळा, नद्यांचे प्रदूषण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, औरंगजेब कबरीचा वाद, धार्मिक हिंसाचार, लाडकी बहीणवरुन राज ठाकरेंनी परखड मत व्यक्त केले. जाणून घ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे...
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
- ईव्हीएमवरुन निशाणा: हा म्हणे हारलेला पक्ष निवडणुका संपल्या सगळ्या गोष्टी झाल्या. गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करुन ज्यांची मत दिसली त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. आणि ज्या मतदारांनी मनसेला मतदान करुन देखील इलेक्टोनिक मशिनमध्ये मते दिसली नाहीत, त्यांचेही आभार. जे झालं ते झालं आता बघायचं ते पुढचं, असे म्हणत राज ठाकरे यांनी ईव्हीएमवरुन निशाणा साधला.
- महाकुंभवर टीका: नव्याने वारं शिरलेल्या हिंदूत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का... ज्या नद्यांना आपण माता मानतो अत्यंत भीषण अवस्था आहे. ज्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा.. गंगा साफ करावी अशी बोलणारी पहिली व्यक्ती म्हणज राजीव गांधी. तेव्हापासून अजून गंगा साफ करतच आहेत. महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत.
- छावा चित्रपट: छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं.
- औरंगजेबाची कबर: औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुन्दकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही.
- कर्जमाफी: आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं का नाही झाली कर्जमाफी? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका.
- संतोष देशमुख हत्या प्रकरण: बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ?
- लाडकी बहीण: लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे ?विधानसभेत चर्चा सुरु आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही. लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत. आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे.
- टोरेस घोटाळा: टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा.
- मराठीवरुन आवाहन: तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षांच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या..
- भाजपला ऑफर: यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस राज्याकडे नीट लक्ष द्या. चांगल्या दृष्टीने पाहिलेत तर आम्हाला तुमचा पाठिंबा. प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारुन करा तरच आमचा पाठिंबा.. असे राज ठाकरे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world